News Flash

‘आरजे’ शुभम पर्यावरण विषयाचा अभ्यासक होता!

नागनदी सफाई अभियानाचे कोडकौतुक शहरात सुरू असताना शुभमने मात्र प्रशासनाची चांगलीच कानउघाडणी केली.

‘आरजे’ (रेडिओ जॉकी) म्हणजे मुळातच अखंड, अर्थहीन बडबड अशीच प्रतिमा, पण त्याही पल्याड जाऊन ‘आरजे’ एखाद्या विषयाचा गाढा अभ्यासक असू शकतो, हे सत्य नागपुरातील ‘आरजे’ शुभमच्या मृत्यूनंतर समोर आले. त्याचा मृत्यू चटका लावून जाणारा ठरला असला तरीही मृत्यूनंतर पर्यावरण या विषयातील त्याची मुशाफिरी मात्र नव्याने समोर आली आहे.

शहर विकासाच्या दिशेने वाटचाल करत असताना हिरवळीच्या नागपुरात प्रदूषण, दूषित पर्यावरणाच्या समस्या असू शकतात हे अलीकडच्या काही वर्षांत समोर आले आहे. जागतिक पातळीवरील एका अहवालात पर्यावरणाच्या बाबतीत उपराजधानी माघारलेली होती आणि स्वच्छ भारत अभियानातही शहर माघारलेलेच होते. रेडिओच्या खासगी वाहिन्यांमधून नेहमीच यावर ताशेरे ओढले जातात. मात्र, क्वचितच या ताशेऱ्यात त्या विषयाचा अभ्यास ‘आरजे’मध्ये दिसून येत होता.  ‘आरजे’ शुभमच्या बाबतीत मात्र उलट होते. पर्यावरणाचे मुद्दे तो सुद्धा उचलत होता, पण पर्यावरणावर आधारित त्याची बडबड ही अभ्यासपूर्ण होती. पर्यावरणाशी संबंधित प्रत्येक मुद्याचे तो तांत्रिक विश्लेषण करत होता. त्याच्याकडे संबंधित विषयाची कागदपत्रेही असायची आणि त्याचबळावर तो प्रशासनाला धारेवर धरत होता. नागनदी सफाई अभियानाचे कोडकौतुक शहरात सुरू असताना शुभमने मात्र प्रशासनाची चांगलीच कानउघाडणी केली.

नागनदीचे पुनरुज्जीवन आणि नागनदीची सफाई या दोन्ही गोष्टीतला फरक त्याला ठाऊक असल्याने त्याच्या ‘शो’मधून प्रशासनाला त्याने चांगलेच धारेवर धरले होते. तोच मुद्दा गणपती विसर्जनातही होता. विसर्जनावर ‘लाईव्ह शो’ करत असताना फुटाळा तलावावर जाऊन त्याने फक्त बडबडच केली नाही तर नागरिकांना त्याने कृत्रिम तलावात विसर्जन करण्यासाठी आग्रह केला, त्यांच्याकडील निर्माल्य गोळा करण्याचे कामही त्याने केले. शहरातील सांडपाण्याची व्यवस्था, घनकचऱ्याची व्यवस्था आदीचे बारकावे त्याला माहिती होते. वृक्षतोडीच्या नियमांची माहिती असल्यानेच शहर आणि शहराच्या बाहेरील वृक्षतोडीवर त्याने कायद्याचा संदर्भ देत प्रहार केले. त्यामुळेच पर्यावरणवाद्यांशी त्याचे सूर जुळले.

अवघ्या २२-२३ वषार्ंच्या ‘आरजे’ शुभमसोबत जेव्हा पहिलाच ‘मॉर्निग शो’ केला, त्यावेळी त्याच्यातला पर्यावरण अभ्यासक झळकला. पर्यावरणावरील त्याचे प्रश्न अतिशय बोचणारे होते. तो कधीच हवेत नव्हता, तर अभ्यासपूर्ण मांडणी तो करत होता. म्हणूनच त्याच्याशी सूर जुळले आणि दोन वर्षांत तब्बल २५-३० वेळा आम्ही पर्यावरणाच्या मुद्यावरून एकत्र आलो. पर्यावरणावर बोलणारे अनेक आहेत, पण तो पर्यावरणावर काम करणार कार्यकर्ताही होता, असे ग्रीन विजिल फाउंडेशनचे कौस्तुभ चटर्जी यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 3:59 am

Web Title: rj shubham was the scholar of environmental subject
Next Stories
1 यंदाच्या विदर्भरंग दिवाळी अंकातही नाविन्याच्या शोधाची परंपरा कायम
2 नेत्यांचे नातेवाईक इच्छुकांच्या यादीत
3 विदर्भ वार्तापत्र : विदर्भात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मुख्यमंत्र्यांची कसोटी!
Just Now!
X