|| महेश बोकडे

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्य़ातील धक्कादायक स्थिती; सुरक्षित प्रवासी वाहतुकीवरच प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) त्यांचा प्रवास सर्वात सुरक्षित असल्याचा दावा केला जातो, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूर या गृहजिल्ह्य़ात २०१६-१७ च्या तुलनेत २०१७-१८ मध्ये एसटी बसच्या किरकोळ अपघाताची संख्या ८३ टक्क्यांनी, तर जीवघेण्या अपघातांची संख्या ६० टक्क्यांनी वाढल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. यवतमाळहून-नागपूरला येणाऱ्या एसटीच्या शिवशाही बसच्या अपघाताने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचे प्रमुख साधन म्हणून एसटीकडे बघितले जाते. शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेक नागरिक शिक्षण, व्यवसाय, नोकरीसह विविध कामांकरिता एसटीनेच प्रवासाला प्राधान्य देतात. बसमध्ये प्रशिक्षित चालक तसेच प्रत्येक बसची नियमित देखभाल दुरुस्ती केली जात असल्याने एसटीचा प्रवास सर्वात सुरक्षित असल्याचे महामंडळाचे सर्व अधिकारी सांगतात, परंतु एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात १ एप्रिल २०१७ ते ३१ डिसेंबर २०१८ या बारा महिन्यांच्या काळात जीवघेण्या अपघातांची आकडेवारी मात्र वेगळेच सांगत आहे. या काळात जिल्ह्य़ात तब्बल १६ जीवघेणे अपघात झाले. गेल्यावर्षी याच काळात ही संख्या दहा होती. एसटीच्या किरकोळ स्वरूपाच्या अपघातातही मोठी वाढ झाली असून गेल्यावर्षीच्या १२ अपघातांच्या तुलनेत यंदा तब्बल २२ अपघात झाले आहेत. या कालावधीत गंभीर स्वरूपाच्या अपघातात, मात्र घट झाली आहे. गेल्यावर्षीच्या ५२ अपघाताच्या तुलनेत ही संख्या यंदा ४८ वर आली आहे. एसटीच्या वाढलेल्या अपघाताला चालकाने मोबाईलवर  बोलणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन, रस्त्यांवरील खड्डे यासह इतरही अनेक कारणे जबाबदार असल्याचे या क्षेत्राचे जाणकार सांगतात. एसटीच्या अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर अपघाताची संख्या वाढल्याचे मान्य केले.

खड्डे व धोकादायक वळणांमुळे अपघात

शहर आणि जिल्ह्य़ात नागपूर मेट्रो, नवीन जलवाहिनी टाकणे, नवीन वीज वाहिनी टाकणे, लहान-मोठय़ा रस्ते विकासाची कामे मोठय़ा प्रमाणावर सुरू असल्याने अनेक रस्त्यांवर एकेरी वाहतूक सुरू आहे. रस्त्यांची अवस्था वाईट आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले असून त्यामुळे अपघात वाढले आहेत. अनेक ठिकाणी असलेली धोकादायक वेळणेही अपघातासाठी कारणीभूत ठरत असल्याने येथे एसटीचे अपघात वाढल्याचे दिसत आहे.