चार जखमी, संतप्त जमावाकडून बस जाळून रास्तारोको

नागभिड-भिवापूर मार्गावर शाळेतून घराकडे परतणाऱ्या विद्यार्थिनींना भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. यात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर इतर चार विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत. सुगंधा धनराज पिंपळकर (१७) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. तर युवांशी महेश करकडे (१७), दिपाली देवराव नागरीकर (१७), ऐश्वर्या भाऊराव बोधिले (१७) आणि धनश्री वासुदेव आकरे (१७) अशी जखमी विद्यार्थिनींची नावे आहेत. त्यापैकी युवांशीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते.

मृत सुगंधा ही चिमूर तालुक्यातील रहिवासी असून जखमी मुली भिवापूर तालुक्यातील आहेत. त्या भिवापूर येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात अकराव्या वर्गात शिकतात. शाळा सुटल्यानंतर सकाळी या विद्यार्थिनी सायकलने उमरेडच्या दिशेने निघाल्या असता जेएच-०५, ए-०७७१ हा तात्पुरता क्रमांक असलेला ट्रक जमशेदवरून वडोदऱ्याकडे जात होता. दरम्यान ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने विद्याथिर्नींना धडक दिली. अपघातानंतर ट्रकचालक संतोषसिंग दिवानसिंग (वय ४५,  रा. साकुजी, जमशेदपूर, झारखंड ) हा ट्रक सोडून पळून गेला. भिवापूर पोलिसांनी घटनास्थळ गाठले व ट्रकचालकाचा शोध घेऊन त्याला अटक केली. जखमी मुलींना ताबडतोब नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) दाखल करण्यात आले. या अपघातानंतर संतप्त विद्यार्थी व नागरिकांनी रस्त्यावर टायर जाळून रास्तारोको केला. परिसरात उभी असलेली बस जाळली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जवळपास दोन ते तीन तास नागपूर-वडसा मार्गाची वाहतूक खोळंबली होती. पोलीस अधीक्षक राकेश ओला हे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले व पोलिसी बळाचा वापर करून त्यांनी  रस्ता मोकळा केला.

बंदोबस्ताला जाणाऱ्या पोलीस वाहनाला अपघात

ही घटना घडल्यानंतर नागपूर ग्रामीण पोलीस मुख्यालयातून भिवापूर पोलिसांच्या मदतीला अधिकची कुमक पाठवण्यात आली. २० पोलीस कर्मचारी एमएच-३१, डीझेड-००५४ क्रमांकाच्या बसमधून भिवापूरकडे जात असताना उमरेड मार्गावर एमएच-४०, एन-११९९ क्रमांकाच्या ट्रकने या बसला धडक दिली. त्यामुळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ईश्वर वानखेडे आणि हवालदार लोमेश गायधने गंभीर जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.