नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

नागपूर रेल्वेस्थानक आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेल्वेस्थानक व्हावे, त्यासमोरील रस्त्यांचा विकास करण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने १०० कोटी रुपये देण्यात येईल. तसेच लोखंडी पूल ते रेल्वेस्थानक या रस्त्यावर असलेला उड्डाणपूल पाडून त्या जागी अत्याधुनिक पद्धतीने रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

मानकापूर रेल्वेपुलाच्या खाली ओमनगर येथील रेल्वे क्रॉसिंगवर बांधण्यात आलेल्या भुयारी रेल्वेमार्गाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार विकास महात्मे, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर, आमदार सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता एम. चंद्रशेखर आदी उपस्थित होते.

रस्त्यावरील अपघात कमी करण्यासोबतच लोकांचे प्राण वाचवण्यासाठी रस्त्यांच्या विकासाला व रुंदीकरणाला प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगताना गडकरी म्हणाले, नागपूरच्या रस्ते सुधारण्यासाठी आवश्यक असणारा संपूर्ण निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यासोबतच मेट्रो रेल्वेच्या विकासाचे नऊ हजार कोटीचे काम सुरू आहे. बुटीबोरी, हिंगणा आदी विस्तारासाठी ८०० कोटीचा विस्तार होणार आहे. मेट्रोच्या माध्यमातून नागपूरचा आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर म्हणून विकास होत आहे. नागपूर शहरात केवळ पायाभूत सुविधांचा विकास होत नसून बेघरांना ५० हजार घरे देण्याचा संकल्प असून त्यापैकी १० हजार घरांच्या बांधकामाला सुरुवात झाली असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पायाभूत सुविधांच्या विकासामुळे नागपूर शहर बदलत असून औद्योगिक विकासाला चालना मिळत आहे. नागपूरच्या या बदलत्या स्वरूपामुळे जे उद्योजक भेट देतात, ते या शहराच्या प्रेमात पडतात आणि येथे मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करतात. त्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतानाच देशातील पहिला एरोस्पेस पार्क रिलायन्सच्या माध्यमातून मिहान येथे सुरू होत आहे. संपूर्ण विमान येथे निर्माण होत असल्यामुळे रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. संचलन रेणुका देशकर यांनी केले.