बर्डीत रविवारी वाहनांची ११६ टक्के गर्दी

शहरातील बहुतांश वाहने सीताबर्डी, एसटी बसस्थानक, गांधीबाग उद्यान परिसर आणि वर्धा मार्गावर उभी केली जातात. शनिवारी आणि रविवारी  येथील वाहनतळांचा वापर अनेकपटीने वाढतो. रविवारी सीताबर्डी मार्केटमधील वाहनतऴावर क्षमतेपेक्षा अधिक म्हणजे ११६ टक्के वाहने उभी केली जातात.

वाढत्या वाहन संख्येच्या तुलनेत शहरात वाहनतळाची व्यवस्था नाही. त्यातल्या त्यात सुटीच्या दिवशी म्हणजे शनिवारी आणि रविवारी महत्त्वाच्या ठिकाणी वाहनांची तुफान गर्दी होते. महापालिकेने अर्बन मास ट्रासिट कंपनी लि.कडून (यूएमटीसी) वाहनतळाच्या स्थितीचा अभ्यास करवून घेतला. शहरातील मुख्य बाजारपेठ सीताबर्डी, मंगळवारी बाजार रोड, वर्धा मार्ग, गांधीबाग पार्क, इटर्निटी मॉल पार्किंग, तहसील कार्यालयातील वाहनांची संख्या आणि वाहनतळ व्यवस्था याबद्दल सर्वेक्षण करण्यात आले. त्यांच्या अहवालात  साप्ताहिक सुटी आणि त्या आधीच्या दिवशी बाजारपेठ, प्रमुख चौक आणि प्रमुख रस्त्यावरील वाहनतळाची माहिती देण्यात आली. शहरातील इटर्निटी मॉल रोड, तहसील कार्यालय आणि मंगळवारी बाजार रोड या ठिकाणी अगदी काही मिनिटासाठी वाहने उभी केली जात आहे. हा कालावधी अध्र्या तासापेक्षा कमी असतो. मात्र, इतर ठिकाणी ही वेळ काही तासांची असते. अंजुमन कॉलेज जंक्शन, व्हेरायटी चौकात अस्ताव्यस्त वाहने लावली जातात. काही ठिकाणी तर वाहनतळाच्या जागेचा वाणिज्यिक वापर होतो. नियमांचे पालन होत नाही. वस्तूची विक्री करणारे दुकान आणि त्याच्या शेजारीची वाहनांची पार्किंग असे चित्र आढळून आले, तर इटर्निटी मॉलच्या आजूबाजूला अवैधपणे वाहने उभी केली जातात. सीताबर्डी मार्केट परिसरात उपलब्ध वाहनतळांना पर्यायी वाहन नाही. त्यामुळे कायम वाहतूक कोंडी होत असते, असेही अहवालात म्हटले आहे.

दोन ते सहा तास वाहने रस्त्यावर

सीताबर्डी बाजार, एसटी बसस्थानक, गांधीबाग पार्क आणि वर्धा मार्गावर दोन तासांपेक्षा अधिक वेळ वाहने उभी केली जातात. साप्ताहिक सुटीच्या दिवशी इटर्निटी मॉल रस्त्यावर ४.० तास  आणि मंगळवारी बाजार मार्गावर  ३.६ तास वाहने उभी केली जातात. साप्ताहिक सुटीच्या आदल्या दिवशी इटर्निटी मॉल मार्ग ६.८ तास  आणि मंगळवारी बाजार मार्ग ६.२ तास वाहने उभी करतात, असे दिसून आले आहे.

प्रन्यासचा पार्किंग प्लाझा कोणासाठी?

नागपूर सुधार प्रन्यासचे इटर्निटी मॉलजवळील पार्किंग कॉम्प्लेक्स ज्या उद्देशाने बांधले, तसा त्याचा उपयोग होत नाही. त्याऐवजी लोक रस्त्याच्या कडेला वाहन उभी करतात. तसेच रस्त्यांच्याकडेला वाहन उभी केली जात असल्याने रहदारीला अडथळा होत आहे.