सिव्हिल लाईन्स भागाकडेच लक्ष, इतरत्र मात्र दुर्लक्ष

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन तीन आठवडय़ांवर आलेले असताना सिव्हील लाईन्स भागातील रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. अन्य भागात सुरू असलेली कामे कंत्राटदारांनी थांबविली असल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शहरातील विविध भागात रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली, परंतु त्यातील ७० टक्के कामे अर्धवट स्थितीत आहेत. कंत्राटदाराचे थकित वेतन देण्यात न आल्यामुळे काही ठिकाणी कामे बंद करण्यात आली आहेत.

महापालिकेच्या निवडणुका बघता विद्यमान नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील सिमेंट आणि डांबरीकरणाची कामे हाती घेतली. कंत्राटदारांनी रस्ते खोदून ठेवले आणि सिमेंटचा पहिला थर देण्यात आला. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून ही सर्व कामे थांबली असून त्याचा नागरिकांना त्रास होऊ लागला आहे. पूर्व, मध्य, दक्षिण, उत्तर नागपुरातील अनेक रस्त्यांची अवस्था फारच वाईट झाली आहे.

शहरातील विविध भागातील प्रभागातील अंतर्गत ५२ रस्त्यांच्या कामांच्या मंजुरीसाठी स्थायी समिती असून येणाऱ्या सभेत त्या कामांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.  त्यामुळे शहरात येणाऱ्या मोठय़ा प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू होणार आहेत, परंतु सध्या सुरू असलेली कामे पूर्ण केली जात नसल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ होणार असल्यामुळे सिव्हील लाईन्स भागातील रस्ते आणि इतर विकास कामाकडे महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे.

सिव्हील लाईन्स शहरबस व्यवस्था, पथदिवे आणि रस्त्यांची दुरुस्ती करण्याची लगबग सुरू झाली आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्तांनी विधिमंडळ अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सर्व प्रमुख रस्ते, पदपथ आणि पथदिवे व्यवस्थित करण्याचे निर्देश दिले. विशेषत: विधानभवन परिसर तसेच मंत्र्यांची, अधिकाऱ्यांची, कर्मचारी निवासस्थाने असलेल्या परिसराची स्वच्छता, रस्ते, वाहतूक सिग्नल, शहरबस स्वच्छता व दुरुस्ती, बस प्रवासी निवाऱ्याची साफसफाई करण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय अधिवेशन काळात शहरातील पाणीपुरवठा, विद्युत दिवे नादुरुस्त राहणार नाहीत याची काळजी घेण्यासंदर्भात बजावण्यात आले. स्टार बसचे फुटलेले काच त्वरित बदलण्यात यावे. फुटलेल्या काचाच्या बसेसमधून प्रवासी वाहतूक करू नये, बस प्रवासी निवारा स्वच्छ ठेवावा व तेथे विद्युत दिव्यांची व्यवस्था असावी, रस्त्याची स्वच्छता राखावी, रस्ता दुभाजकावरील झाडांना पाणी देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देशही यावेळी आयुक्तांनी दिले.

नागरिकांना त्रास

नंदनवन पोलीस ठाण्याच्या परिसरात सिमेंट रोडचे काम सुरू केले. गेल्या काही दिवसांपासून ते अर्धवट स्थितीत असताना बंद करण्यात आले आहे. मानेवाडा, रघुजीनगर, नाईक रोड, जुनी मंगळवारी, वर्धमाननगर, क्वेटा कॉलनी, देशपांडे लेआऊट, जागनाथ बुधवारी, पत्थर फोड आखाडा, चिटणीस पार्क, निकालस मंदिर परिसरात सिमेंट रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली. मात्र, त्यातील अनेक कामे बंद आहेत त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.