मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतरही तिढा कायम
मेडिकलच्या अखत्यारित असलेल्या बीएस्सी नर्सिग कॉलेज आठ वर्षांनंतरही ‘टय़ुटर’च्या भरवशावर आहे. येथे काही वर्षांपूर्वी आश्चर्यकारकरित्या पदे वितरित केली होती. त्यात कुणी प्राचार्य तर कुणी उपप्राचार्य बनले, परंतु त्यांना शासकीय मान्यता नव्हती. आठ वर्षांपासून पदनिर्मितीचा लढा येथील शिक्षक लढत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तदर्थ पदे भरण्यास मान्यता दिली. मात्र, अद्याप अंमलबजावणी नाही. काही महिन्यांपूर्वी आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू येथे येऊन गेल्यावरही स्थिती ‘जैसे थे’ असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आदिवासी केंद्रात घेण्यात आलेल्या कार्यशाळेत उपस्थित राहण्यासाठी आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. म्हैसेकर हे काही आठवडय़ापूर्वी नागपूरला आले होते. भेटीचे निमित्त साधून बीएस्सी नर्सिग कॉलेजमधील ‘टय़ुटर्स’नी डॉ. दिलीप म्हैसेकर यांची भेट घेतली. याप्रसंगी नागपूरसह राज्यातील चार शासकीय बीएस्सी नर्सिग कॉलेजच्या पदस्थापनेचा विषय उपस्थित केला होता, परंतु अद्याप काहीच झाले नाही. यावर्षी बीएस्सी नर्सिग कॉलेजमध्ये प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदांची पदस्थापना न झाल्यामुळे प्रवेश थांबवण्याचे निर्देश आरोग्य विद्यापीठाने दिले होते.
येथील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला परवानगी नाकारण्यात आली होती, परंतु ही पदे भरण्यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने शपथपत्र दिल्याने पुन्हा वर्षभरासाठी प्रवेशाला मान्यता दिली. विशेष म्हणजे, याच विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१६च्या डिसेंबरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात बैठक बोलावली होती. पात्र शिक्षकांना या पदांच्या अस्थापनेत सामावून घ्या, असे आदेश दिले. वैद्यकीय संचालनालयाने अध्यादेश जारी केला. यात तदर्थ पद्धतीने ‘टय़ुटर’च्या पदांचा दर्जा वाढवून (एमएस्सी नर्सिग) उच्च शैक्षणिक पात्रतेनुसार ज्येष्ठता यादीद्वारे नियुक्ती आदेश देण्यात आले. त्याला तीन महिने लोटले. अद्याप वैद्यकीय शिक्षण व शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांच्या कार्यालयातील बाबूगिरीने सेवाज्येष्ठता यादी तयार केली नाही. तेव्हा या महाविद्यालयातील प्रश्न सुटणार कसे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

प्राचार्य, उपप्राचार्य पदांच्या प्रतीक्षेत सेवानिवृत्त
सरकारने प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापकांच्या पदांना आठ वर्षांपासून मान्यता न दिल्यामुळे शैक्षणिक कामे ही ‘टय़ुटर’च्या भरवशावर सुरू आहेत. बीएस्सी नर्सिगच्या अभ्यासक्रमाला २००६ पासून शिकवणारा सर्वात ज्येष्ठ ‘टय़ुटर’ला प्राचार्य- उपप्राचार्यपद कधी मिळेल या प्रतीक्षेत होते, परंतु वयाची साठी उलटल्यामुळे अखेर दोन ज्येष्ठ ‘टय़ुटर’ निवृत्त झाले. वित्त मंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतरही संचालनालयातील बाबूगिरीने सेवाज्येष्ठता यादी रखडली. या विषयावर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. म्हैसेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, होऊ शकला नाही.