आरपीएफची कारवाई

रेल्वेगाडीतून उतरून घराकडे जाण्यासाठी ऑटोरिक्षात बसत असताना दागिणे आणि रोख असलेली बॅग नसल्याचे लक्षात येताच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या एका जवानाने स्थानकावर उभ्या गाडीकडे धाव घेतली. परंतु गाडीत बॅग नव्हती. रेल्वे सुरक्षा दलाकडे तक्रार येताच यंत्रणा कामाला लागली आणि मिनिटात सुमारे सव्वालाख रुपयांचा ऐवज असलेली बॅग परत मिळाली.

सीआरपीएफ जवान अमोल शिग्ने हे आपल्या कुटुंबासोबत कोल्हापूर- नागपूर एक्सप्रेसने कोल्हापूरहून नागपूरला आले. ते नागपूर स्थानकावर उतरले आणि स्थानकाबाहेर आले. घरी जाण्यासाठी ऑटोरिक्षात बसत असताना एक बॅग नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. एक बॅग गाडीत राहून गेले. लागलीच ते बॅग शोधण्यासाठी फलाट क्रमांक पाचवर उभ्या असलेल्या गाडीकडे धाव घेतली. गाडीत बॅग नव्हती. त्यामुळे ते आरपीएफ ठाण्यात आले. येथे सहायक उपनिरीक्षक अभय बेदरकर यांना घडलेला प्रकार सांगितला. बॅगमध्ये लॅपटॉप, सोन्याचे दागिणे, एटीएम कार्ड, आधारकार्ड असा सुमारे एक लाख २० हजार रुपयांचा ऐवज होता. बेदरकर यांनी पोलीस निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांना सूचना दिली. त्यानंतर बॅग शोधण्याची मोहीम सुरू झाली. सर्वत्र शोध घेण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. परंतु बॅग मिळाली नाही. तेव्हा आरपीएफच्या एका जवानाने फलाट क्रमांक पाचवर कार्यरत कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. या कर्मचाऱ्यांनी गाडीची तपासणी करताना बॅग सापडल्याचे सांगितले आणि बॅगची शोध लागला. या शोध मोहिमेवर वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योतिकुमार सतीजा हे जातीने लक्ष ठेवून होते. ही बॅग शिग्ने परिवाराला सहायक सुरक्षा आयुक्त दिनेशसिंह तोमर यांच्या उपस्थितीत परत करण्यात आली.