नागपूर : रिपाइं भाजपमध्ये कधीही विलीन करणार नाही. नरेंद्र मोदी यांचा अजेंडा हा बाबासाहेबांच्या संविधानाला धरून आहे. त्यामुळे आम्ही केवळ सत्तेसाठी नाही तर वैचारिक भूमिकेमुळे एकत्र आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या विदर्भ महामेळाव्यानिमित्त आठवले आज शुक्रवारी नागपुरात आले होते. मेळाव्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

आठवले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजय विरोधकांना पचत नाही. त्यामुळे  ते आता ‘ईव्हीएम’च्या मागे लागले आहेत.  मोदी  सुपरपॉवर आहेत. निवडणूक आयोगाने उद्या मतपत्रिकांवरही निवडणुका घेतल्या तरी जिंकून दाखवू. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीगढ विधानसभेत जेव्हा काँग्रेस जिंकली तेव्हा ‘ईव्हीएम’ ठीक होती. मात्र, लोकसभेत अपयश येताच पुन्हा ‘ईव्हीएम’ला दोष देणे सुरू झाले. आगामी विधानसभा भाजप आणि सेनेने एकत्र लढवावी. यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासाठी दहा जागा सोडाव्या, अशी आमची मागणी आहे. यातील चार जागा विदर्भाला देण्याचा निर्णय आहे. यासंदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. आम्ही आमच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहोत, असेही अठवलेंनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडीची राज्यातील हवा गेली असून अनेक लोक प्रकाश आंबेडकरांना सोडून जात असल्याचाही आरोप केला.

आमच्या मतांमुळे भाजपला सत्ता!

आमच्या मतामुळे भाजपला सत्ता मिळाली. बाबासाहेबांनी आम्हाला सांगितले होते, की सत्तेत राहायला हवे.  आज एकटय़ाने सत्ता मिळवणे शक्य नाही. म्हणून मित्र पक्षाच्या मदतीने सत्तेत राहून समाजाचे प्रश्न मार्गी लावत असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.