राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सहभागी असलेल्या रिपब्लिकन पक्षाला (आठवले) लोकसभा निवडणुकीत कुठेच स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे विदर्भातील कार्यकर्त्यांनी युतीच्या दबावतंत्राचा वापर करत युतीच्या विरोधात भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात आठवले गटाच्या रिपाइं पदाधिकाऱ्यांची रविवारी यवतमाळ येथे बैठक होणार असून त्यात तसा निर्णय घेतला जाणार आहे.

महायुतीत आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्ष सहभागी झाला. महायुतीत सहभागी झाल्यानंतर महायुतीच्या प्रत्येक कार्यक्रमात, तसेच विविध नेत्यांच्या दौऱ्यात बहुसंख्येने पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. २०१४ च्या लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीत रिपाइं आठवले गट ताकदीने उतरला आणि केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आले. यावेळी दक्षिण  मुंबईसह विदर्भात एका जागेची मागणी आठवले गटाने केली होती. रिपब्लिकन पक्षासोबत झालेल्या करारानुसार एक महामंडळाशिवाय कुठेही वाटा मिळाला नाही. उलट शिवसेना – भाजपच्या पदाधिकाऱ्यांना विविध महामंडळावर स्थान देण्यात आले आहे. राज्य आणि केंद्र सरकार रिपब्लिकन पक्षाला सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप करत विदर्भातील रिपब्लिकन गट निवडणुकीच्यावेळी महायुतीच्या विरोधात भूमिका घेण्याचा निर्णय घेणार असून त्या संदर्भातील भूमिका यवतमाळ येथील बैठकीत ठरवली जाणार असल्याचे पक्षाचे पदाधिकारी राजन वाघमारे यांनी सांगितले. २४ एप्रिलला प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांच्या अध्यक्षतेत  होणाऱ्या या बैठकीत माजी आमदार अनिल गोंडाणे, प्रकाश बन्सोड, महेंद्र मानकर, राजू बहादुरे, सुधाकर तायडे. मोहन भोयर आदी राज्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.