15 December 2018

News Flash

प्रसिद्धीबाबत संघ प्रथमच दक्ष

एरवी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित बैठकांच्या वेळी संघ प्रसिद्धीपासून दूर राहत असत.

पत्रकार कक्षात प्रतिनिधी सभेची माहिती देताना संघाचे पदाधिकारी.

एरवी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित बैठकांच्या वेळी संघ प्रसिद्धीपासून दूर राहत असत. आता काळाची पावले ओळखत प्रतिनिधी सभेच्या निमित्ताने विविध प्रसारमाध्यमांमधून उमटणाऱ्या संघाच्या बातम्याबाबत विशेष काळजी घेणे सुरू केले आहे. नागपुरात शुक्रवारपासून सुरू झालेल्या प्रतिनिधी सभेच्या निमित्ताने संघाच्या प्रचार विभागाने केलेल्या जय्यत तयारीवरून  प्रसिध्दीबाबत संघ अधिक खऱ्या अर्थाने ‘दक्ष’ होत असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये संघाशी संबंधित घटनांबाबत विविध माध्यमांमधून सातत्याने वार्ताकन होते. मात्र त्यावर कधीही संघाकडून अधिकृत प्रतिक्रिया दिली जात नाही. त्यामुळे प्रसार माध्यमे  स्वत: अंदाज बांधून बातम्या प्रकाशित क रतात. त्यावरही संघ  कधीही खुलासा करीत नाही. प्रारंभीच्या काळात माध्यमांमधून होणाऱ्या वार्ताकनावर वा चर्चांवर प्रतिक्रिया न देण्याची प्रथा संघाने पाळली होती. केंद्रात आणि राज्यासह देशभरातील अन्य राज्यात भाजपाची सत्ता आली. यात संघाचे योगदान मोठे होते. त्यामुळे या संघटनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले. शिवाय माध्यमांचा जनमानसावरील वाढता प्रभाव लक्षात घेता संघानेही  गेल्या काही वर्षांत माध्यमांवर लक्ष केंद्रीत केले आहे. संघाच्या अधिकृत प्रचार विभागाकडे माध्यमांशी संबंधित सर्व विषय हाताळण्याची जबाबदारी देण्यात आली असून संघ पध्दतीने या विभागाचे जिल्हास्तरापर्यंत नियोजन करण्यात आले आहे. नागपुरातील प्रतिनिधी सभेतील वार्ताकन व प्रसिध्दीची जबाबदारी तसेच माध्यमांशी समन्वयाची जबाबदारीही याच प्रचार विभागाकडे सोपविण्यात आली आहे. प्रतिनिधी सभेच्या निमित्ताने विशेष पत्रकार कक्ष स्मृती मंदिर परिसरात तयार करण्यात आला आहे. तेथे दररोज संघाचे अधिकारी पत्रकारांशी वार्तालाप करतात.  प्रतिनिधी सभेच्या उद्घाटनाला केवळ छायाचित्रकारांना काही वेळासाठी परवानगी देण्यात आली. पत्रकार परिषद तसेच प्रतिनिधी सभेत होणाऱ्या घडामोडींची अधिकृत माहिती देशभरातील माध्यमांपर्यंत पोहोचावी यासाठी संघाने व्यवस्था केली आहे. या प्रतिनिधी सभेसाठी बाहेरुन मोठय़ा प्रमाणात विविध वाहिन्याचे प्रतिनिधी दाखल झाले आहे.

First Published on March 10, 2018 2:23 am

Web Title: rss cautious for publicity