हिंदुराष्ट्र ही राजकीय, सत्ताकेंद्री संकल्पना नसल्याचेही मत

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदूराष्ट्र तसेच हिंदुत्त्वाच्या भूमिकेवरून अकारण टीका केली जाते. मात्र, संघाच्या दृष्टिकोनातून हिंदुत्वाचा अर्थ व्यापक असून, पूजापद्धतीशी जोडून त्याला संकुचित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हिंदुत्व हे स्वयंपूर्णतेशी जोडलेले आहे, अशा शब्दांत सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी त्याची व्यापक मांडणी केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक विजयादशमी सोहळ्यात भागवत यांनी हिंदुराष्ट्र ही संकल्पना राजकीय किंवा सत्ताकेंद्रीत नाही, असे नमूद केले. या वेळी करोनामुळे हा मेळावा केवळ ५० जणांच्या उपस्थितीत पार पडला. ‘आमच्यासाठी हिंदुत्व हा शब्द आपल्या प्रथा-परंपरांवर आधारीत मूल्यपद्धतीचा आहे. त्यामुळेच या व्याख्येत १३० कोटी भारतीय येतात. भारतमातेचे सुपूत्र आणि सुकन्या असल्याचे मानणाऱ्या सर्वाचा त्यात समावेश आहे. आम्ही व्यापक अर्थाने हिंदुत्वाकडे पाहतो. या शब्दाचा विसर पडला तर समाजाला जोडणारे बंध सैल होतात’, असे सरसंघचालक म्हणाले.

‘‘भारताच्या विविधतेला तडा देण्याचा प्रयत्न काही जण करतात. अनेक जण त्यांच्या खोटय़ा प्रचाराला बळी पडतात. देशविरोधी घोषणा देणारी मंडळी मंडळी यात सामील असतात. राजकीय स्वार्थ, कट्टरता, फुटीरतेची भावना पसरवणाऱ्यांकडे दुर्लक्ष करून घटना तसेच नियमांचे पालन करून आपल्याला वाटचाल करावी लागणार आहे’’ असे भागवत यांनी नमूद केले.

परस्परांशी व्यवहार करताना संयम व धैर्यपूर्वक आचरण ठेवा, असे आवाहन त्यांनी केले. राजकीय लाभांच्या पलीकडे जाऊन विचार करा, असेही ते म्हणाले.

सरकारचे कौतुक

अर्थ, शेती, उद्योग, कामगार तसेच शिक्षण क्षेत्रात भारतीय परंपरेला अनुसरुन काही चांगली पावले उचलण्याचा प्रयत्न झाले, अशा शब्दांत  सरसंघचालकांनी केंद्र सरकारचे कौतुक केले. स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे त्यांनी समर्थन केले. संघर्षांतून प्रगती होणार नाही, असे त्यांनी नमूद केले.

चीनविरुद्ध आघाडी हवी

नेपाळ, श्रीलंका आणि अन्य शेजारी देशांच्या साहाय्याने सरकारने चीनविरुद्ध आघाडी तयार केली पाहिजे, भारताला चीनपेक्षा अधिक शक्तिशाली बनले पाहिजे, असेही ते म्हणाले. चीनच्या विस्तारवादी हेतूच्या संदर्भाने भागवत यांनी तैवान आणि व्हिएतनाम यांची उदाहरणे दिली. सर्वासमवेत मैत्रीपूर्ण संबंध असावे असा आमचा हेतू आहे, मात्र त्याकडे कोणी आमचा दुबळेपणा समजून पाहिले आणि आम्हाला दुर्बल करण्याचा प्रयत्न केला तर ते कदापि स्वीकारार्ह नाही आणि आतापर्यंत संबंधितांना त्याची चांगलीच जाणीव झाली आहे, असेही ते म्हणाले.

चीनपेक्षा सामर्थ्यशाली होणे गरजेचे

लष्करी सुसज्जतेबाबत भारताने चीनपेक्षा अधिक सामर्थ्यशाली होण्याची नितांत गरज असल्याचे भागवत यांनी स्पष्ट केले. चीनच्या विस्तारवादी हेतूची संपूर्ण जगाला जाणीव आहे, असेही भागवत म्हणाले. चीनच्या विरोधात भारताने लष्करी दृष्टिकोनातून अधिक सुसज्ज असणे गरजेचे आहे, असे या वेळी ते म्हणाले. चीनने केलेल्या घुसखोरीला भारताने ज्या पद्धतीने प्रत्युत्तर दिले त्याने चीन धास्तावला आहे, भारताचा भूभाग काबीज करण्याचा प्रयत्न चीनने केला त्याला आपली संरक्षण दले, सरकार आणि जनतेने समर्थपणे उत्तर दिले, चीनकडून कोणत्या पद्धतीने प्रतिक्रिया येईल ते आपल्याला माहिती नाही, त्यामुळे दक्ष आणि सुसज्ज राहणे हा मार्ग आहे. लष्करी सुसज्जता, आर्थिक स्थिती, आंतरराष्ट्रीय संबंध आणि शेजारील देशांशी संबंध याबाबत आपण चीनपेक्षा अधिक सामर्थ्यशाली असणे गरजेचे आहे, असेही भागवत म्हणाले.