* सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन
* पाकव्याप्त काश्मीरमधील कारवाईचे कौतुक

गोसेवेच्या नावाखाली दुष्कृत्य करणारे लोक समाजात आहेत. मात्र, प्रामाणिकपणे आणि निष्ठेने गोसेवा करणाऱ्यांची संख्याही प्रचंड आहे. या दोघांना एकाच तागडीत तोलून प्रामाणिक गोसेवकांना विनाकारण टीकेने झोडपू नका, असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी येथे केले.

विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे येथील रेशीमबाग मैदानावर शस्त्रपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना सरसंघचालकांनी विविध विषयांवर भाष्य केले. त्यांचे हे भाष्य नेहमीच्याच पठडीतले, नेहमीच्या विषयांवरचेच होते. यावेळी स्वयंसेवकांनी कवायती आणि पथसंचलन केले. ‘देशात पशुहिंसा विरोधी कायदा अस्तित्वात आहे. कायद्यानुसार सरकारने गोरक्षा करणे आवश्यक आहे. मात्र, सरकारकडून कायद्याची अंमलबजावणी होताना दिसत नसल्याने गोसेवक पुढे येऊन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आग्रह धरतात, परंतु त्या प्रकारांना अतिरंजकपणे मांडण्यात येऊ नये. स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी समाजात दुफळी निर्माण होईल, असे काही करूनये. सर्व गोरक्षकांना एकाच तागडीत तोलणे चुकीचे आहे. प्रामाणिक गोसेवक आणि पाखंडी गोसेवक यांच्यातील फरक सरकारने ओळखावा आणि त्यानुसार दोषींवर कारवाई करावी, असे सरसंघचालक म्हणाले.

काश्मीर खोऱ्यातील सध्याची स्थिती चिंताजनक असून सीमेपलीकडील देशातून भारतात दहशतवाद पसरवून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न शेजारी राष्ट्रांकडून सुरू असून उरी लष्करी छावणीवरील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार आणि लष्कराने स्वीकारलेली भूमिका वा सैन्याचा पराक्रम अभिनंदनीय आहे, अशा शब्दात पाकव्याप्त काश्मीरमधील लक्ष्यभेदी कारवाईचा थेट उल्लेख न करता त्यांनी मोदी सरकारची पाठ थोपटली. ही आक्रमकता कायमस्वरूपी राहावी, असेही ते म्हणाले.  भारताला अस्थिर ठेवण्यासाठी आणि जागतिक स्तरावर देशाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी काही शेजारी राष्ट्र जाणीवपूर्वक कश्मीरसह सीमावर्ती भागांमध्ये दहशतवाद, घुसखोरी घडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे सरकार आणि लष्कराने गाफील राहून चालणार नाही, असे भागवत यांनी बजावले.

जम्मू, लडाखसह काश्मीरच्या मोठय़ा भागात शांतता नांदते आहे. भारत-पाक नियंत्रण रेषेवर दहशतवादी कारवाया चालू आहेत. त्यावर आक्रमकपणे कारवाई करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवावे, असे भागवत म्हणाले. मीरपूर, मुजफ्फराबाद, गिलगिट, बाल्टीस्तान आदी भागांचा उल्लेख करून, संपूर्ण काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग आहे, असे त्यांनी पाकिस्तानला ठणकावले. विरोधकांना सरकारच्या धोरणांवर टीका करायला हवी. राजकीय स्वार्थासाठी देशाच्या सुरक्षेबाबत तडजोड करू नये, अशा शब्दात भागवत यांनी लक्ष्यभेदी कारवाईबाबत संशय व्यक्त करणाऱ्यांचा समाचार घेतला.

काश्मीर खोऱ्यातील हिंदू पंडितांना नागरिकत्व बहाल करणे आणि त्यांना सुविधा देण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. अजून किती दिवस त्यांनी प्रतीक्षा करायची? असा सवालही त्यांनी जम्मू-काश्मीर वा केंद्र सरकारला केला आहे. या बाबतीतही ताबडतोब दोन्ही सरकारने निर्णय घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. याशिवाय रोजगाराभिमुख, स्वावलंबी आणि स्वाभिमान मनुष्य तयार करणारी शिक्षण व्यवस्था लागू करण्याचे विचार करून त्यांनी शिक्षण धोरणात बदलाची आवश्यकता आहे. शिक्षणाचे बाजारीकरण रोखून सर्वसामान्यांना मोफत किंवा कमी खर्चात शिक्षणाची सोय उपलब्ध करून द्यावी आणि शिक्षकांनी व्यवसाय म्हणून शिक्षकी पेशाकडे न बघता देशासाठी नवीन पिढी तयार करण्याचे आव्हान म्हणून बघावे, अशी शिक्षण व्यवस्था लागू करण्याचा हितोपदेश भागवत यांनी सरकारला केला.

चाळीस टक्के गावात मंदिरावरून भेदाभेद

संघाने मध्य भारतातील ९ हजार गावांचा सव्‍‌र्हे केला. त्यात ४० टक्के गावांमध्ये मंदिर, ३० टक्केगावात पाणी आणि ३५ टक्के गावांमध्ये स्मशानभूमीवर समाजात भेदाभेद आहे. एकविसाव्या शतकात श्रेष्ठ, कनिष्ठ आणि जाती, समाजावरून भेदाभेद करणे लाजिरवाणी बाब असल्याचेही भागवत यांनी यावेळी नमूद केले.