सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन

नागपूर : पूर्वाचलकडील अनेक राज्यांबाबत भीती होती. आसामचेही काश्मीर होईल, असे बोलले जात होते. परंतु ५० वर्षांपूर्वी स्वयंप्रेरणेने गेलेल्या स्वयंसेवकांमुळे आणि आजही काही स्वयंसेवक व स्वयंसेवी संस्था तेथे सेवाकार्य करीत असल्यामुळे तेथील लोक खंबीरपणे भारतासोबत उभे असून चीनच्या सीमेवर भारत माता की जय, वंदेतमातरम या घोषणा देत आहेत, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

विजय प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आसाम आणि पूवरेत्तर राज्यातील अनुभवावर आधारित नंदकुमार जोशी लिखित शुभारंभ या पुस्तकाचे प्रकाशन सरसंघचालकांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. रामनगरातील शक्तीपीठमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मगंधा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष लेखिका शुभांगी भडभडे, लेखक नंदकुमार जोशी उपस्थित होते. यावेळी डॉ.भागवत म्हणाले, पूर्वाचल राज्यातील अनुभवावर  लिहिलेले हे केवळ पुस्तक नाही तर तेथील परंपरा, संस्कृतीची ओळख आहे. अरुणाचल प्रदेश हे शुद्ध भारतीय नाव असून तो प्रदेश आपला आहे. तेथील अनेक लोक ज्यावेळी दिल्लीला येतात त्यावेळी दिल्लीतील अनेक जागृत लोक त्यांना तुम्ही चीनमधून आला आहात का म्हणून विचारतात. त्यावेळी त्या लोकांच्या काय भावना होत असतील याचा विचार केला पाहिजे. आपल्यात ऐक्य नाही आणि त्याचाच फायदा परकीय लोक घेत आहेत. अनेक मिशनरी त्या ठिकाणी येऊन राहत असून आपण दुरावल्याचा फायदा परकीय उचलण्याचा प्रयत्न करीत आहेत. आता तर मिशनरींपैकी अनेक लोक संघाच्या सेवा कार्याशी जुळले असल्याचे भागवत म्हणाले.