सरसंघचालक मोहन भागवत यांचे सूचक वक्तव्य

नागपूर : आज भारतात लघुउद्योगांची संख्या ९९ टक्के आहे. अलीकडच्या काळात या क्षेत्राने चांगली भरारी घेतली आहे. परंतु तरीही काही अडचणी आहेत. त्या दूर करण्यासाठी प्रसंगी संर्घषही केला जाईल, असे सूचक वक्तव्य  सरसंघचालक डॉ.  मोहन भागवत यांनी केंद्र सरकारचे नाव न घेता केले.

रेशीमबाग येथील कवी सुरेश भट सभागृहात लघुउद्योग भारतीच्या रौप्य महोत्सवानिमित्त शुक्रवारी आयोजित राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर लघुउद्योग भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष जितेंद्र गुप्त व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवि वैद्य उपस्थित होते.     सरसंघचालक म्हणाले, लघुउद्योगांना अधिक चालना देण्यासाठी सरकारने योजना तयार करणे आवश्यक आहे. असे केल्यास क्षेत्रात समृद्धी  येईल.

मोठय़ा उद्योग क्षेत्राला यांत्रिकीकरण हवे आहे. यामध्ये कामगारांचा रोजगार  हिरावण्याची शक्यता असते. मात्र लघुउद्योग कामगारांना आपला परिवार मानतो. त्यामुळे रोजगार देण्याच्या दृष्टीने लघुउद्योग क्षेत्राकडे बघितले जाते. लघुउद्योग क्षेत्र संघटित व्हायला पाहिजे.

समग्र धोरणाकरिता वातावरण निर्मिती व शक्ती उभी करण्याची गरज आहे. समग्रतेचा विचार करून शक्ती वाढवावी. वैचारिक व मानसिक पद्धतीने देशाचे वातावरण बदलायला पाहिजे. समाजाच्या एका वर्गात समग्रतेची दृष्टी आहे. परंतु देशाने यादृष्टीने विचार करायला पाहिजे, असेही ते म्हणाले.