राहुल गांधींना उत्तर देण्यासाठी संघपरिवारातूनच सवाल

महात्मा गांधी यांच्या हत्येत संघाचा सहभाग नाही, अशा आशयाचा नेहरू व पटेलांमधील पत्रव्यवहार उपलब्ध असताना संघाचे पदाधिकारी राहुल गांधींना उत्तर देण्यासाठी त्याचा आधार का घेत नाहीत, असा प्रश्न आता संघवर्तुळातच उपस्थित केला जात आहे. संघाचे अभ्यासक दिलीप देवधर यांनी तर पत्रक काढून संघाने बचावासाठी या पत्रव्यवहाराचा आधार घ्यावा, असा सल्ला पदाधिकाऱ्यांना दिला आहे.

गांधीहत्येत संघाचा सहभाग आहे की नाही, याची चौकशी करण्यासाठी तत्कालीन सरकारने वरिष्ठ पोलीस अधिकारी संजीवी यांची नेमणूक केली होती. त्यांनी या हत्येनंतर २९व्या दिवशी केंद्रीय गृह मंत्रालयाला आपला अहवाल सादर केला. त्यात या हत्येत संघाचा सहभाग नाही, तसेच या संदर्भात सुरू असलेल्या चर्चेतही तथ्य नाही, असे स्पष्टपणे नमूद होते.

हा अहवाल मिळताच तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंना पत्र लिहिले. २७ फेब्रुवारी १९४८ ला लिहिलेल्या या पत्रात संजीवी यांनी सादर केलेल्या अहवालातील निष्कर्ष नमूद आहेत. त्यामुळे नेहरू व पटेल या दोघांनाही संघाचे निर्दोषत्व तेव्हाच ठाऊक झाले होते.

तरीही या दोघांनी याच कारणावरून संघावर घातलेली बंदी नंतरचे आठ महिने उठवली नव्हती. संजीवी यांच्या अहवालाविषयी अनभिज्ञ असलेल्या संघाने ही बंदी उठवावी म्हणून नेहरू व पटेलांशी बराच पत्रव्यवहार केला, पण त्याला सरकारकडून प्रतिसाद मिळाला नाही. देशात अटलबिहारी वाजपेयी सत्तेत आल्यावर त्यांनी नेहरू व पटेलांमधील हा पत्रव्यवहार प्रसिद्ध केला. सध्या हा पत्रव्यवहार सहाव्या खंडात उपलब्ध आहे. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक रंगा हरी यांनी २०१० मध्ये गुरुजी गोळवलकरांच्या जन्मशताब्दीनिमित्त एक ग्रंथ प्रकाशित केला. यात हा पत्रव्यवहार पुन्हा समाविष्ट करण्यात आला. गांधीहत्येत संघाचा सहभाग नाही, हे सिद्ध करणारा अधिकृत दस्तऐवज उपलब्ध असतानासुद्धा सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत सुरू असलेल्या वादात त्याचा वापर संघाकडून का केला जात नाही, असा प्रश्न आता देवधर यांनी उपस्थित केला आहे. संघाचे पदाधिकारी वाचत नाहीत काय, असा खोचक सवाल त्यांनी आज ‘लोकसत्ता’शी बोलताना उपस्थित केला.