गेल्या तीन महिन्यांपासून गणवेश खरेदी करण्याबाबत संघ स्वयंसेवकांना शाखा आणि एकत्रीकरणातून वारंवार सूचना देण्यात आल्यानंतर आता संघाच्या विजयादशमी उत्सवाला काही तास उरलेले असताना बदललेल्या नवीन गणवेशाचा तुटवडा निर्माण झाला आहे. गणवेश खरेदीसाठी गेलेल्या अनेक स्वयंसेवकांना त्यांच्या मापाचा गणवेश न मिळाल्याने त्यांना संघ कार्यालयातून परत जावे लागल्यामुळे उद्या होणाऱ्या संघाच्या कार्यक्रमात जुन्या गणवेशातच स्वयंसेवक दिसण्याची चिन्हे आहेत.

रा. स्व. संघाच्या नागौरमध्ये झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत स्वयंसेवकांचा गणवेश बदलाचा निर्णय झाल्यानंतर देशभर त्यांची विक्री सुरू झाली. खाकी हाफ पॅन्टऐवजी तपकिरी रंगाची फुलपॅन्ट आणि पांढरा शर्ट, डोक्यावर काळी टोपी, पायात काळे बूट, असा गणवेश झाल्यानंतर नियमित जाणाऱ्या स्वयंसेवकांना हा गणवेश अडचणीचा झालेला असला तरी संघाचा आदेश असल्यामुळे तो स्वयंसेवकांनी मान्य केला आणि नव्या गणवेशाची विक्री केली. विजयादशमी उत्सवानिमित्ताने दोन आठवडय़ांपूर्वी संघाचे एकत्रीकरण झाले त्या वेळी नव्या गणवेशात स्वयंसेवकांच्या उपस्थितीने हजाराची संख्या गाठलेली नसताना संघाच्या नेत्यांसमोर उत्सवाच्या दिवशी संख्या जमविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. संख्यावाढीसाठी नव्या गणवेशाचा फारसा परिणाम झाला नसल्याचे समोर आले होते. मात्र भाजपने त्यासाठी पुढाकार घेऊन आगामी महापालिका निवडणुका बघता शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सर्वाना या उत्सवात नव्या गणवेशात सहभागी होण्याचे आवाहन केले आणि गेल्या पाच दिवसांत संघाच्या गणवेशाची मोठय़ा प्रमाणात विक्री झाल्याने आता गणवेशाचा तुटवडा निर्माण झाला.

अनेक स्वयंसेवकांनी तर वेळेवर गणवेश घेऊ म्हणून इतके दिवस दुर्लक्ष केले. मात्र विजयादशमी उत्सव काही तासांवर आलेला असताना अनेक संघ स्वयंसेवक गणवेश खरेदी करण्यासाठी रेशीमबागेतील संघ कार्यालयात गेल्यावर काहींना त्यांच्या आकाराच्या फुलपॅन्ट मिळाल्या  नाही, तर काहींना शर्ट मिळाला नाही. गेल्या दोन दिवसांत गणवेशाची विक्री मोठय़ा प्रमाणात झाल्याचे भांडार विभागातून सांगण्यात आले. वेळेवर येणाऱ्यांना त्यांच्या आकाराची पॅन्ट देणे कठीण आहे. अनेक स्वयंसेवकांनी त्या रंगाशी मिळतेजुळते कापड घेऊन पॅन्ट शिवल्या असल्या तरी नव्याने कापड घेऊन वेळेवर कोणताही शिंपी शिवून देणार नाही, त्यामुळे ज्यांच्याजवळ गणवेश नाही किंवा ज्यांना खरेदी करता आला नाही, असे स्वयंसेवक संघाच्या जुन्याच गणवेशावर दिसण्याची शक्यता आहे.