पूर्वाचल भागात त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या तीन राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून त्रिपुरामध्ये प्रथमच भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले आहे. नागालँड आणि मेघालयमध्ये भाजपने यश मिळाले आहे. या घवघवीत यशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाराष्ट्रातील प्रचारकांची भूमिका निर्णायक ठरली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पूर्वाचलमध्ये संघाचे वेगवेगळ्या पातळीवर काम सुरू असून त्याची सूत्रे नागपुरातील संघ प्रचारकांच्या हाती आहे, हे येथे उल्लेखनीय.

प्रथम केंद्रात आणि त्यानंतर राज्यात झालेल्या सत्तापालटात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोलाचा वाटा होता. त्रिपुरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून डाव्या आघाडीचे  साम्राज्य असताना भाजप त्या ठिकाणी नावाला नव्हती. मात्र, ६० जागांसाठी झालेल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजप ४३ जागा मिळून पूर्ण बहुमत मिळाले आणि या यशामध्ये संघाचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रचारक राहिलेले आणि गेल्या काही वर्षांत भाजपचे संघटनमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळणारे सुनील देवधर.  शिलाँगमध्ये संघाचे प्रचारक म्हणून काम करताना त्यांनी ‘माय होम इन इंडिया’ संघटना स्थापन केली आणि पूर्वाचलमध्ये संघाच्या माध्यमातून आदिवासी आणि वनवासी क्षेत्रात मोठे काम उभे केले. त्यावेळी त्यांच्यासोबत नागपूरचे प्रसाद बर्वे, रमेश शिलेदार, नंदकुमार जोशी, सुनील किटकरू हे मराठी चेहरे होते.

नुकत्याच झालेल्या हिमाचल आणि गुजरातच्या निवडणुकीत भाजपला अतिशय काठावर यश मिळाले असताना त्यात संघाच्या सक्रियतेची चर्चा झाली नाही. मात्र, त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या पूर्वाचलच्या निवडणुकीत भाजपला मिळालेले यश सर्वाचे लक्ष वेधणारे ठरल्याने त्यामागील कारणांचा शोध घेताना या भागात अनेक वर्षांपासून संघाच्या माध्यमातून सुरू असलेली कामे ठळकपणे पुढे आली.

आसाम निवडणुकीतील भाजप विजयाचे श्रेय संघ व तेथे काम करणारे महाराष्ट्रातील बहुसंख्येने असलेले प्रचारक यांच्याकडे जाते. त्रिपुरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्र सेविका समितीच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून विविध सामाजिक क्षेत्रात कामे सुरू आहेत. त्याची सूत्रे नागपुरातील प्रचारकांकडे आहे. संघाचे अखिल भारतीय पदाधिकारी सुनील कुळकर्णी पूर्वाचलमध्ये प्रचारक म्हणून काम करीत आहे.

भाजपचे काम सांभाळणारे नागपूरकर रमेश शिलेदार पूर्वी संघाचे प्रचारकच होते. प्रचारक म्हणूनच त्यांनी तेथे कामाला सुरुवात केली. नंदू जोशी, सुरेंद्र कालखेडकर, शशी चौथाईवाले, प्रसाद बर्वे, सुनील किटकरू, अशोक वर्णेकर, विनय तारे, विराग पाचपोर, राम सहस्त्रभोजनी या सर्व नागपूरकर संघ प्रचारकांनी अनेक वर्षे पूर्वाचलमध्ये कामे केली आहे. या राज्यात खेडोपाडी जाऊन भाजपचा पाया मजबूत केला होता. सध्या अकोल्याचे संदीप कविश्वर, दीपक बोरडे हे वनवासी कल्याण आश्रमचे काम पहात आहे. सुरेंद्र नारखेडकर, उल्हास कुळकर्णी हे सुद्धा पूर्वाचलमध्ये संघाचे काम करीत आहे. याशिवाय विवेकानंद केंद्राचे काम पाहणारे विश्वास लपालीकर, पार्वतीपूर (अरुणाचल) मध्ये कार्यरत असणारे व आसामच्या जनतेशी दांडगा संपर्क असणारे अशोक वर्णेकर, राजेश देशकर ही आणखी काही नावे आहेत. पूर्वाचलमध्ये अनेक राज्यात राष्ट्र सेविका समितीने मोठय़ा प्रमाणात काम उभे केले आहे. त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयमध्ये समितीचे काम सुरू आहे. समितीच्या सुनीता हळदेकर या गेल्या अनेक वर्षांपासून याच भागात काम करीत आहे. त्या मूळच्या औरंगाबादच्या आहेत.

पूर्वाचलमध्ये प्रचारक म्हणून अनेक वर्षे काम करणारे सुनील किटकरू यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, पूर्वाचल राज्यात त्यात विशेषत: त्रिपुरामध्ये भाजपला जे यश मिळाले आहे, ते केवळ काँग्रेस आणि डाव्या आघाडीच्या विरोधातील असंतोष. मोठय़ा प्रमाणात त्यात गरीब लोक आहेत. संघाने वेगवेगळ्या माध्यमातून सेवा कार्य करीत असताना या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष दिले. गावागावात जाऊन तेथील लोकांना जागृत करण्याचे काम गेले. शिवाय केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर या भागात बरीच विकास कामे मार्गी लागली. त्यामुळे हा विजय मिळाला आहे. संघ प्रचारक म्हणून काम करताना त्याचा राजकीय फायदा काय होईल, याचा विचार संघ प्रचारक कधीच करीत नसल्याचे त्यांनी सांगितले.