केवळ नागपूर विद्यापीठाला लक्ष्य केल्याने जाणकारांची नापसंती

नागपूर : अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासाचा समावेश केल्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ सध्या टीकेचे धनी ठरले असले तरी शेजारच्या गडचिरोली जिल्ह्य़ातील गोंडवाना विद्यापीठासह दिल्ली, पं. बंगाल आणि जेएनयूमध्येसुद्धा यापूर्वीच हा इतिहास विद्यार्थ्यांना शिकवला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बी.ए. (इतिहास)च्या दुसऱ्या वर्षांतील अभ्यासक्रमात बदल करून त्यात संघ इतिहासाचा समावेश केल्याने नागपूर विद्यापीठावर सध्या टीका होत आहे. विशेषत: यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे.

यासंदर्भात विद्यापीठ वर्तुळातील काही जाणकारांशी चर्चा केली असता त्यांनी फक्त नागपूर विद्यापीठच नव्हे तर विदर्भातील गोंडवाना आणि प. बंगालमधील वर्धमान विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ व जे.एन.यू.मध्ये देखील अशाप्रकारचा अभ्यासक्रम शिकवला जातो. मग नागपूर विद्यापीठावरच टीका का तसेच याबाबतीत आताच ओरड का, असा सवाल केला. या मुद्याकडे राजकीय चष्म्यातून बघितले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे (इतिहास) अध्यक्ष डॉ. श्यामराव कोरेटी म्हणाले की, एम.ए. अभ्यासक्रमात हा विषय शिकवला जातो, बी.ए.च्या विद्यार्थ्यांना या विषयाची माहिती व्हावी म्हणून या विषयाचा समावेश करण्यात आला आहे. हा वादाचा मुद्दा नाही, अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून त्याकडे बघितले पाहिजे. इतर विद्यापीठातही हा विषय शिकवला जातो. अभ्यासक्रमातून साम्यवाद वगळण्यामागे कुठलाही हेतू नव्हता. हा विषय कालबाहय झाल्याने वरील निर्णय घेण्यात आला. मानव्यशास्त्र विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शर्मा म्हणाले, हा अभ्यासक्रम सर्वसमावेशक आहे. इतर संघटनांचाही इतिहासाचा त्यात समावेश आहे. दरम्यान, संघ इतिहासावरून टीका होत असल्याने विद्यापीठ वर्तुळात याबाबत नाराजी  व्यक्त केली जात आहे. अभ्यासमंडळात निवडून आलेल्या सदस्यांचा समावेश असतो, ते विषयतज्ज्ञ असतात व बहुमताने  निर्णय घेतात. त्यानंतर विद्वत परिषदेत यावर चर्चा होते. मग आताच या विरोधात ओरड का, असे विद्यापीठ वर्तुळात बोलले जात आहे.

‘‘एम.ए.च्या (इतिहास) अभ्यासक्रमात १७ वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहास समाविष्ट आहे. पदवी पातळीवरदेखील विद्यार्थ्यांना याची माहिती व्हावी म्हणून बी.ए. च्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे, यात कुठलेही राजकारण नाही, असे मानव्यशास्त्र विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शर्मा यांनी सांगितले.’’