शंकराचार्यांनी एखाद्या घटनेबाबत मत व्यक्त करताना विचारपूर्वक आणि त्यासंदर्भातील पाश्र्वभूमी विचारात घ्यावी, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते व मुस्लिम राष्ट्रीय मंचचे मार्गदर्शक इंद्रेशकुमार यांनी येथे पत्रकार परिषदेत केले. शंकराचार्याच्या विधानाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून होणारा विरोध महत्त्वाचा आहे.

मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज, शनिवारपासून येथील आमदार निवासात सुरू झाली. त्यानिमित्ताने इंद्रेशकुमार यांनी पत्रकारांनी संवाद साधला. ही संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघटेनशी संबंधित असून इंद्रेशकुमार या संघटनेचे प्रमुख नेते आहे, हे येथे उल्लेखनीय.

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी अलिकडेच शनिशिंगणापूरच्या मंदिरातील महिलांच्या प्रवेशासंदर्भात वादग्रस्त विधान केले होते. यासंदर्भात इंद्रेशकुमार यांना विचारल्यावर ते म्हणाले की, शंकराचार्यानी काहीही विधाने करण्यापूर्वी विचार करावा. मंदिरातील महिलांचा प्रवेश हा वाद सौहाद्र्रपूर्ण चर्चेतून सुटू शकतो. त्यासाठी ‘मार्केटिंग’ करण्याची गरज नाही. शनिशिंगणापूर वगळता इतर ठिकाणी असलेल्या शनीच्या मंदिरात महिलांना प्रवेश दिला जातो. शनिशिंगणापूरचा वाद चर्चेतून सुटू शकतो.

गोहत्येसंदर्भात मुस्लिमांची भूमिका काय, याकडे इंद्रेशकुमार यांचे लक्ष वेधल्यावर ते म्हणाले की, मुस्लिमांच्या धर्मग्रंथात गोहत्येला स्थान नाही. मक्का मदिनामध्ये गोहत्येवर बंदी आहे. इसीसमध्ये मुस्लिम तरुणांनी सहभागी होऊ नये म्हणून मुस्लिम राष्ट्रीय एकता मंचने एक वेगळा सेल तयार केला असून त्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. १६ ते १८ एप्रिलदरम्यान चालणाऱ्या मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या कार्यकारिणीच्या बैठकीत मुस्लिमांचे शिक्षण, कुटुंब नियोजन, चुकीची तलाक पद्धती आणि दंगलीमागील कारणांबाबत चर्चा केली जाणार आहे. मुस्लिम तरुणांनी कोणाला आदर्श मानायचे? भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम की, मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी कसाब?, याबाबतही चर्चा होणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी मंचतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांचीही माहिती दिली.

‘भारत माता की जय’वर वाद हा भाषिक

भारत माता की जय म्हणू नये, असे कुठल्याही इस्लाम ग्रंथात म्हटलेले नाही. हा भाषिक वाद आहे. हिंदीत भारत माता की जय या शब्दाचा जो अर्थ आहे, तोच अर्थ हा उर्दूतही आहे. भारत माता की जय म्हणू नये, असे आवाहन करणाऱ्यांच्या वक्तव्यात कट्टरतावाद दिसून येतो. मुस्लिमांमध्येही एखाद्याचा सत्कार करताना जिंदाबादचे नारे लावले जातात, त्यामुळे भारत माता की जय म्हणण्याला विरोध करणे, असे सांगणे हा कटुता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असे इंद्रेशकुमार म्हणाले.