25 April 2019

News Flash

आरएसएस सर्वाधिक धर्मनिरपेक्ष संघटना: राज्यपाल सी. विद्यासागर राव

कारण या संघटनेने प्रत्येक व्यक्तीचे मत आणि धर्माचे पालन करण्याच्या अधिकारांचा नेहमी सन्मान केला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) सर्वाधिक धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक संघटनांपैकी एक असल्याचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) सर्वाधिक धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक संघटनांपैकी एक आहे. कारण या संघटनेने प्रत्येक व्यक्तीचे मत आणि धर्माचे पालन करण्याच्या अधिकारांचा नेहमी सन्मान केला असल्याचे वक्तव्य राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले आहे. संघाची यात्रा शानदार आणि कठीण राहिल्याचेही ते म्हणाले.

रामटेक येथील कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात आरएसएसचे दिवंगत सरसंघचालक गोळवलकर गुरूजींच्या नावावर शैक्षणिक संकुल आणि गुरूकुलमचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी विद्यासागर राव बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. गुरूजी नावाने प्रख्यात असलेले एम एस गोळवलकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक होते.

ते म्हणाले, संघाच्या रूपाने डॉ. के बी हेडगेवार यांनी लावलेल्या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. याच्या शाखा जगभरात आहेत. संघाचा प्रवास शानदार आणि कठीण असा राहिला आहे. संघासमोर सर्वांत मोठे आव्हान हे महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर निर्माण झाले होते. त्यावेळी ४ फेब्रुवारी १९४८ ला संघावर सरकारने बंदी घातली होती.

गोळवलकर गुरूजींनी महत्वाची भूमिका वटवली. त्यांनी कारागृहातूनच राष्ट्रव्यापी सत्याग्रहाचे आवाहन केले. गुरूजींनी सरकारला संघावर करण्यात आलेल्या आरोपांना सिद्ध करण्याचे आव्हान दिले आणि बंदी हटवण्याची मागणी केली. गोळवलकर यांच्या निरंतर प्रयत्नामुळे १२ जुलै १९४९ रोजी बंदी मागे घेण्यात आली.

संघाचे विरोधक म्हणतात अगदी त्याच्या उलट आरएसएस सर्वाधिक धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक संघटनांपैकी एक आहे. संघाने प्रत्येक व्यक्तीचे आणि धर्माचे पालन करण्याच्या अधिकाराचा सन्मान केला असल्याचे राव यांनी म्हटले.

First Published on February 6, 2019 6:26 am

Web Title: rss is the most secular and inclusive organisation says governor c vidyasagar rao