संघाच्या मुखपत्रातून सेनेवर हल्ला
केंद्र आणि राज्यात सत्तेत राहून भाजपवर कायम टीका करणाऱ्या शिवसेनेवर आता संघाच्या मुखपत्रातून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. भाजपचे सरकार निझामांच्या बापाचे असेल तर रझाकार कोण?, असा सवाल राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या नागपूरच्या तरुण भारतमधून सेनेला करण्यात आला आहे.
केंद्रात आणि राज्यात सत्तेत राहूनही सेनेने भाजपवर जहरी टीका करणे सुरूच ठेवले आहे. अलीकडेच सेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका करताना देशात निझामांच्या बापाचे राज्य असल्याची टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर भाजपच्या पातळीवर देण्यात आले होते. मात्र, रविवारी प्रथमच संघाने शिवसेनेवर प्रतिहल्ला केला आहे. निझामांच्या बापाची सत्ता असेल, तर त्यात सहभागी झालेले मंत्री कोण? निझामांच्या सरकारमधील सालारजंग की कासाम रझवी?, असे सवाल करताना ज्यांनी जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा देत दलितांच्या वस्त्यांवर हल्ले केले, कुठलेही आंदोलन पुकारून हप्ते वसुली केली, त्यांना रझाकार म्हणायचे काय?, असे जहरी प्रश्न सेनेला विचारण्यात आले आहेत. ‘ बावचळलेल्या सेनेचा तोल सुटलाय’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या लेखात सेनेवर थेट हल्ला चढविण्यात आला आहे.
केंद्रात आणि राज्याच्या राजकारणात भाजपने शिवसेनेला मागे टाकले आहे, त्यामुळे सेनेच्या पोटात दुखणे सुरू झाले असून त्यामुळेच संघ, भाजप, मोदी आणि फडणवीस यांच्यावर जहरी शब्दात टीका केली जात आहे. एकीकडे सत्तेत राहायचे आणि दुसरीकडे सरकारवर टीका करायची, मग शिवसेनेला फक्त राजकीय स्वार्थाचे तत्वज्ञान आहे काय?, असा सवाल करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीत एकतर्फी सेना-भाजप युतीचा विजय झाला. कारण, मोदी लाट कारणीभूत होती, हे लक्षात न घेता शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत जास्तीच्या जागा मागून युती तोडली. या निवडणुकीत सेनेने नरेंद्र मोदी यांना अफझल खानाची उपमा दिली. त्याचाही फटका सेनेलाच बसून त्यांच्या जागा कमी झाल्या. राजकारणात वस्तूस्थितीवर आधारित सल्ला देणारे सोबत असणे महत्त्वाचे असते. केवळ स्वार्थासाठी नेत्याला बरे वाटावे म्हणून खोटे सल्ले देणारे चमचे जमा झाले की, वाईट परिस्थिती निर्माण होते. मुंबई महापालिकेत अनेक वर्षांपासून शिवसेना सत्तेत आहे. त्यांना पुन्हा सत्तेत येण्याचा आत्मविश्वास नाही का? असा सवालही या लेखात करण्यात आला आहे.