राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह दीपक तामशेट्टीवार यांची माहिती

राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार असले तरी त्यांच्याशी संघ शाखा वाढीचा कुठलाही संबंध नाही. संघ विस्ताराचे गेल्या अनेक वषार्ंपासून सुरू असून गेल्या वर्षभरात संघ शाखामध्ये १७०० ने वाढ झाली आहे. गेल्यावर्षीपासून मंडळ पातळीवर शाखा सुरू करण्यात आल्या असून त्यात १८१ ने वाढ झाली आहे. संघ विस्तारात तरुण स्वयंसेवकांची संख्येमध्ये वाढ होत असल्याची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह दीपक तामशेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. विदर्भात संघ स्थान आणि शाखाची शंभरने संख्या वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.

तेलंगणा राज्यात भाग्यनगरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन दिवसीय अखिल भारतीय कार्यकारिणीच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीची माहिती देताना तामशेट्टीवार म्हणाले, या प्रतिनिधी सभेत संघाच्या प्रमुख कार्याची समीक्षा, वर्षभरात राबविण्यात येणारे उपक्रम आणि आणि संघकार्य विस्ताराच्या संदर्भात चर्चा झाली. संघाने २०१८ पर्यंत संघाच्या विस्तारासोबत शाखांची संख्या वाढविण्यासंदर्भात कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. २००६ पासून संघ विस्ताराचा कार्यक्रम हाती घेण्यात आल्यानंतर जिल्हा, तालुका आणि मंडळ पातळीवर संघ विस्ताराचे काम सुरू आहे. दर तीन वर्षांनंतर संघ विस्ताराची समीक्षा केली जाते. देशभरात सध्या ३३ हजार ५२२ स्थानावर (१७१८ ने वाढ) आणि ५२ हजार १०२ शाखा असून गेल्या वर्षीच्या तुलनेत १६७० ने वाढ झाली आहे. त्यात ८० टक्के तरुण स्वयंसेवकांचा समावेश आहे. महाविद्यालयीन आणि व्यवसाय करणाऱ्यांची गेल्या वर्षभरात संख्या वाढली आहे. मंडळ शाखा ८ हजार १२१ होती त्यात १८१ ने वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांंची संख्या २६ हजार ६७६, केवळ महाविद्यालयीन तरुण ७०२८, व्यवसायी तरुण १३ हजार ६१३ आणि प्रौढ ४ हजार ७८५ आहेत. संघाच्यावतीने विविध सेवा कार्य सुरू आहेत त्यात शहरात २ हजार ३७५ तर ग्रामीण भागात २५ हजार १०, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना २० हजार ८४१ आणि स्वावलंबन १४ हजार ४३१ संघटना आहेत. विदर्भात शाखाची संख्या वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.

निर्मल वारी उपक्रमांतर्गत पंढरपूरला गेल्यावर्षी संघाने वारीच्या मार्गावर अनेक उपक्रम राबविले आहे. विशेषत: स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केले असताना वारीच्या मार्गावर जागोजागी ६० हजार ५४० महिला आणि पुरुषांचा सहभाग होता. आगामी काळात वारीमध्ये स्वच्छता आणि मंदिर परिसरातील व्यवस्थामध्ये संघाचे स्वयंसेवक काम करतील, असेही तामशेट्टीवार यांनी सांगितले.

संघाच्या वतीने सामाजिक समरसता अभियान राबविले जात असून त्यात प्रत्येक गावात स्मशान घाट, एक मंदिर, शाळा आणि सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्रित आणणे या विषयावर देशभर सर्वेक्षण केले जात आहे. महाराष्ट्रात सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. पुढील प्रतिनिधी सभेच्या आधी सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले जाईल आणि त्या सभेत सामाजिक समरसता संबंधी धोरण ठरविण्यात येणार असल्याचे तामशेट्टीवीर यांनी सांगितले. याशिवाय ग्राम विकास आणि गो सेवेचा विषयाबाबत गावागावात जनजागृती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. केरळमध्ये मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांंकडून संघ स्वयंसेवकांच्या होत असलेल्या हत्येची निंदा करीत त्या विरोधात केरळ सरकारचा निषेधाचा प्रस्ताव या बैठकीत पारित करण्यात आला.

वर्तमानात देशावर आलेले संकट बघता पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांवर एकात्म मानव दर्शन हा प्रस्ताव मांडण्यात आला.