प्रकरणे शिस्तपालन कृती समितीकडे जाणार
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने मूल्यांकनास टाळाटाळ करणाऱ्या ३०० प्राध्यापकांना नोटिसा बजावल्या असून ज्यांनी मूल्यांकनाचे गांभीर्य न ओळखता थातुरमातूर, असमाधानकारक कारणे सांगितली अशा प्राध्यापकांची प्रकरणे शिस्तपालन कृती समितीकडे (डीएसी) पाठवण्यात येणार असल्याने जबाबदारी टाळणाऱ्या प्राध्यापकांवर पहिल्यांदाच मोठय़ा संख्येने दंडात्मक कारवाई होणार आहे.
चार जिल्ह्य़ांमध्ये कार्यक्षेत्र असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत ६६७ महाविद्यालये संलग्नित असून त्यात एकूण पाच हजार प्राध्यापक काम करतात. त्यातूनच हजारच्या आसपास प्राध्यापकांना मूल्यांकनाची संधी मिळते. विद्यापीठाने परीक्षा घेऊन त्यांचे वेळेत निकाल लावणे हे कष्टप्राय काम असून अनेकदा याच कारणासाठी विद्यार्थी, पालक संतापून शिव्याशाप देतात, शिवाय विद्यार्थी न्यायालयात गेले तर न्यायालयही नाराजी व्यक्त करून विद्यापीठावर ताशेरे ओढते. हिवाळी परीक्षेचे १५ ते २० निकाल अद्याप प्रलंबित असून बुधवार-गुरुवापर्यंत ३० निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. विद्यापीठाला थोडय़ाथिटक्या नव्हे तर तब्बल १ हजार ८६ उन्हाळी परीक्षा आणि ९०० हिवाळी परीक्षा घ्याव्या लागतात, पेपरफुटी होऊ न देता त्यांचे वेळेवर निकाल लावणे हा त्यांच्या कामाचाच भाग आहे. मात्र, अनेकदा मूल्यांकनासाठी प्राध्यापक टाळाटाळ करतात. म्हणूनच यावर्षी तब्बल ३०० प्राध्यापकांना विद्यापीठाने नोटिसा बजावून त्यांच्या न येण्याचे कारण विचारले आहे.
आंतरराष्ट्रीय परिषदा, परिसंवादासाठी परदेशात जाणारे प्राध्यापक, प्राचार्यच सांगतात की परदेशात प्रश्नपत्रिकांचे मूल्यांकन करणे हा त्यांच्या कामाचाच भाग समजला जातो. मात्र, आपल्याकडे मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन करणाऱ्या प्राध्यापकांना वेगळा मेहताना दिला जातो. विद्याशाखानिहाय एका पेपरमागे मूल्यांकनाचे दरही वेगवेगळे आहेत. मूल्यांकनाचे हजारो रुपये कमावणारे प्राध्यापक एकीकडे असताना दुसरीकडे मात्र, मूल्यांकनाला टाळाटाळ करून जबाबदारी झटकणाऱ्या प्राध्यापकांची संख्याही कमी नसल्याचे विद्यापीठाने उगारलेल्या बडग्यावरून दिसून येते. मूल्यांकनास नकार देणारे प्राध्यापक अनेकदा प्राचार्य महाविद्यालयातून मूल्यांकनासाठी सोडत नाहीत, महाविद्यालयात नॅकचे काम आहे, अभ्यासक्रम पूर्ण करायचा असल्याने येणे शक्य नाही, इत्यादी कारणे सांगून प्राध्यापक मूल्यांकनासाठी येत नाहीत. काही प्राध्यापकांची कारणे अतिशय हास्यास्पद असतात. मुळात मूल्यांकनास न आल्याने विद्यार्थ्यांचे निकाल लवकर जाहीर न होण्यास ही प्राध्यापक मंडळीच जबाबदार असते.

प्रकरणे ‘डीएसी’कडे पाठणार -डॉ. खटी
या संदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. नीरज खटी म्हणाले, जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या पेपरचे मूल्यांकन होणार नाही तोपर्यंत निकाल जाहीर होऊ शकत नाही. प्राध्यापक मूल्यांकनाला आलेच नाहीत तर काय करणार? किंवा जागेवर मूल्यांकनासाठी येऊन त्यांनी अहवाल दिला आणि नंतर दहा दिवस आले नाही तर परीक्षा विभागाचा मोठाच खोळंबा होतो. पूर्ण व्यवस्था वेठीस धरली जाते. दरवर्षीच कमी अधिक प्रमाणात प्राध्यापकांना नोटिसा बजावल्या जातात. पण यावर्षी ३०० प्राध्यापकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून असमाधानकारक उत्तरे देणाऱ्या प्राध्यापकांची प्रकरणे ‘डीएसी’कडे पाठवण्यात येणार आहेत.