नियमबाह्य़ वाहन सोडण्यासाठी दबाव; कुही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : शहर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याच्या (आरटीओ) वाहन चालकाने ६  जून २०२० रोजी नागपूर ग्रामीण येथील पाचगाव परिसरात सेवेवर कार्यरत मोटर वाहन निरीक्षकाला इतर सहकाऱ्यांच्या मदतीने अतिभार वाहन सोडण्यासाठी  धमकावले व नंतर  आम्ही आरटीओची माणसे असल्याचे सांगत येथील बरीच जड वाहने पळवून लावली. कुही पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल तोमस्कर असे या वाहन चालकाचे तर मजनू, जावेद पठाण, गुड्डू तोमस्कर असे इतर आरोपींची नावे आहेत. अनिल हा प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर मनवर यांचे वाहन चालवतो.

६ जून रोजी नागपूर ग्रामीण आरटीओच्या भरारी पथकातील मोटार वाहन निरीक्षक राजेश बोराले हे पाचगाव परिसरात गस्तीवर होते. या महामार्गावरून क्षमतेहून जास्त माल वाहून नेणाऱ्या वाहनांना त्यांनी थांबवले. यावेळी आरोपी मजनू, जावेद, अनवर तेथे आले व त्यांनी हे वाहन सोडण्यासाठी आरटीओ अधिकाऱ्याला धमकावले. अधिकाऱ्याला चर्चेत गुंतवून आरटीओचा चालक अनिल आणि गुड्डू तोमसकरने आरटीओतून आल्याचे सांगत येथील अडवलेली वाहने पळवून लावली.

सर्व आरोपींनी अधिकाऱ्याला शिवीगाळ करत बघून घेण्याची धमकीही दिली. हा गंभीर प्रकार अधिकाऱ्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घातला. त्यांच्या सूचनेवरून  कुही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या वाहन चालकाला यापूर्वीही माजी आरटीओ सर्जेराव शेळके यांनी याच पद्धतीच्या प्रकरणात निलंबित केले होते. चौकशीनंतर तो परत सेवेवर रुजू झाला.

या वाहन चालकावर अनेक ट्रांसपोर्ट चालकाशी साटेलोटे असणे, त्याच्या नातेवाईकाच्या नावावर जड वाहने असणे व त्यातून वाहतूक करण्यासह इतरही आरोप आहेत.  या वाहन चालकाला पाठीशी घालणारा अधिकारी कोण,  हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

‘‘वाहन चालकावरील गंभीर आरोपाच्या तक्रारीबाबत परिवहन उपआयुक्त कार्यालयातील एका अधिकाऱ्याला कळवले आहे. या तक्रारीत तथ्य आहे की नाही, हे तपासणीत स्पष्ट होईल. त्यानंतर परिवहन आयुक्तांनाही कळवले जाईल. यापूर्वी त्याला निलंबित करण्यासह  तक्रारीबाबतही चौकशी केली जाईल. गेल्या तीन दिवसांपासून तो सूचना न देता सेवेवर गैरहजर आहे.’’

– दिनकर मनवर,  प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर (शहर)