मुस्लिमांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याचे प्रयत्न – अ‍ॅड. मिर्झा

मुस्लिम महिलांना मनासारखे, सुरक्षित जीवन तर सोडाच पण, घटस्फोटासारख्या मुद्दय़ावरही साधे विचारले जात नाही. पंचायती, महिला मंडळ, व्हाटस्अ‍ॅप किंवा फेसबुकवरून त्यांना तीनदा ‘तलाक’ म्हणत घटस्फोट दिला जातो. पूर्वी आणि आताही इस्लाममधील नियम सांगून गप्प बसविले जाते. सोबतच महिलांनी अभ्यास करावा, कुराणचे वाचन करावे, असे सल्ले देत त्यांनीच बदलण्याचे आवाहन केले जाते. मात्र, पुरुषांनी बदलले पाहिजे, याविषयी कोणीही बोलत नाही, या शब्दांत मुस्लिम महिला मंचच्या अध्यक्ष रुबिना पटेल यांनी भावनावेग व्यक्त करीत महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे गांभीर्य अधोरेखित केले.

रुबी वेलफेअर सोसायटीच्या मुस्लिम महिला मंचच्यावतीने ‘तीनदा घटस्फोटाचे वास्तव आणि राजकारण’  या विषयावर सेवादल महिला महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर सेवादल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय शेंडे, कम्युनिस्ट विचारवंत डॉ. शोमा सेन, अ‍ॅड. फिरदोस मिर्झा आणि अध्यक्षस्थानी माजिद पारेख उपस्थित होते.

घटस्फोटाच्या मुद्यावर महिलांना सहन करावा लागणारा जाच आणि ‘इस्लाम खतरे में है’ अशी हाळी उठवणारे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यांचा समाचार घेत दुसरीकडे भाजप सरकार तीनदा घटस्फोट, समान नागरी कायदा या मुद्यांचा मुस्लिमांच्या विरोधात एक शस्त्र म्हणून वापर करते. जेव्हा हिंदू कट्टर होतात तेव्हा मुस्लिमही कट्टरतेकडे झुकतात आणि त्यातून त्रास सहन करावा लागतो तो महिलांनाच. मात्र, त्यामुळे मुस्लिम महिलांचा रोजगार, शिक्षण, सामाजिक सुरक्षितेचे प्रश्न बाजूला पडून वर्षांनुवर्षे वर्षे दडपणग्रस्त व्यवस्थेत जगावे लागत असल्याचे वास्तव रुबिना पटेल यांनी मांडले.

एक क्षुल्लक मुद्दय़ाला राजकीय रंग देऊन मुस्लिमांच्या जगण्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप अ‍ॅड. मिर्झा यांनी केला. देशातील प्रत्येक समस्येवर एकमेव मुस्लिम माणूस उत्तर असून हा सुधारला की पाकिस्तानचा त्रास संपेल, चीन काही कुरापती करणार नाही, नेपाळ एखाद्या राज्यासारखे आपल्यामध्ये सामावून घेईल? अशी उपरोधिक टीका त्यांनी यावेळी केली. महात्मा फुले किंवा सावित्रीबाई फुले यांनी दीडशे वर्षांपूर्वी जे केले ते साडे चौदाशे वर्षांपूर्वी प्रेषिताने करून ठेवले, अशी मांडणी त्यांनी यावेळी केली. घटस्फोटाच्या मुद्यावर कायदा करणे अमान्य असून धर्माच्या ठेकेदारांनी (मौलवीं)  घेतलेल्या चुकीच्या भूमिकांमुळे इस्लाम धोक्यात असल्याचे स्पष्ट केले.

सोमा सेन यांनी तीन वेळा घटस्फोट मुद्याला विरोध करण्याच्या भूमिकेचे तसेच मुस्लिम पर्सनल लॉमध्ये सुधारणा करण्याच्या मागणीचे समर्थन केले. मुस्लिम समाजात घटस्फोट देण्याची नीतीमत्ता तरी आहे. हिंदुंमध्ये तर तिही नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उदाहरण देऊन सांगितले. पुरोगामी विचारांच्या कार्यक्रमांसाठी सेवादल शिक्षण संस्थेचे सभागृह मोफत उपलब्ध केले जाईल, असे आश्वासन संजय शेंडे यांनी उपस्थितांना दिले. माजिद पारेख यांचे यावेळी अध्यक्षीय भाषण झाले.