डॉ. सीमा दंदे यांनी अवघड स्पर्धेचे आवाहन पेलले

भारतातील सर्वात मोठे मिठाचे वाळवंट.. डोक्यावर तळपणारा सूर्य.. अशा स्थितीत दिलेल्या वेळेत धावतपळत ध्येय गाठणे म्हणजे मोठे दिव्य! वाटेत रक्तबंबाळ करणारी काटेरी कुंपण तर समोर अचानक येणारे प्राणी सुद्धा. त्यातही परिस्थिती कधी दगा देईल याचा नेम नाही. मात्र, या सर्व विपरित परिस्थितीवर मात करत डॉ. सीमा दंदे यांनी पाचव्या स्थानावर येत ध्येय गाठले.

‘रन फॉर रण’ हा भारतातील सर्वात कठीण असा ‘अल्ट्रा ट्रेल रनिंग’ उपक्रम आहे, जो गुजरामधील धोलाविरा येथे आयोजित केला जातो. गुजरातच्या पर्यटन विभागाने आरोग्यपूर्ण जीवनशैली, लांब अंतराची धावण्याची शर्यत, क्रीडा आणि निसर्ग पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने गेल्या काही वर्षांपासून हा उपक्रम सुरू केला. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या या उपक्रमात भारतातीलच नव्हे तर विदेशातील स्पर्धकही सहभागी होतात. नागपुरातील डॉ. सीमा दंदे काही वर्षांपासून धावण्याचा सराव करत आहे. त्यातत त्यांच्या प्रशिक्षकाने त्यांना गुजरातमधील या उपक्रमाची माहिती दिली. साहसी अंगी भिनलेल्या डॉ. सीमा दंदे यांनी लगेच या उपक्रमात सहभागी होण्यासाठी होकार भरला आणि अवघ्या दीड ते दोन महिन्यात त्यादृष्टीने तयारी सुरू केली. हे आव्हान खरं तर सोपे नव्हते, पण त्यांनी ते स्वीकारले. ५१, १०१ आणि १६१ किलोमीटर अशा तीन विभागात ही स्पर्धा होते.

जीपीएसच्या आधारे स्पर्धकाने दिलेले ध्येय गाठणारी भारतातील ही कदाचित पहिलीच स्पर्धा असावी. डॉ. सीमा दंदे यांनी सुरुवात केली तेव्हा एवढे मोठे आव्हान पेलावे लागेल ही कल्पना त्यांना नव्हती. पहिल्या आठ किलोमीटपर्यंत त्यांना तळपणारे उन्हं डोक्यावर घेत मिठागारातून मार्गक्रमण करावे लागले. मिठागाराचा पट्टा संपला आणि पहाडांचे आव्हान समोर आले.

हे पहाड साधेसुधे नव्हे तर काटेरी झुडपांनी वेढलेले होते. त्यातून आताच्या कोपऱ्यावर घासतघासत वर चढणे आणि पुन्हा त्याच पद्धतीने खाली उतरण्याचा पराक्रमही त्यांना करावा लागला. मध्येच रेती आणि मध्येच पुन्हा चिखल अशीही या उपक्रमाची वाट होती.

थरारक प्रवास

मिठागारातून जीपीएस पाहात चालताना पाय कधी वाकडा होईल याचा नेम नव्हता आणि उन्हाने मीठ विरघळण्याचा धोकाही होताच. साधे धावण्याचे जोडे असते तर कदाचित एक किलोमीटरही शक्य झाले नसते, पण आधीच माहिती काढून घेतल्याने त्या पद्धतीचे जोडे आम्ही घातले होते. तरीदेखील अक्षरश: पापड बारीक करताना जसा आवाज येतो, तसा आवाज या मीठागारातून जाताना येत होता. त्यानंतर जीपीएस असूनही दोनदा आम्ही रस्ताच विसरलो. एकदा तर चक्क धरणाची भिंत समोर आली. मग त्या भिंतीवरून चाललो तेव्हा मार्ग मिळाला.

११ तास २३ मिनिट १९ सेकंद!

तब्बल ११ तास २३ मिनिट १९ सेकंदात ध्येय गाठले तेव्हा एक वेगळेच समाधान मिळाले. यावेळी अंगाला रुतलेले काटे आणि इतर कशाचेही भान राहिले नाही. दहा-दहा किलोमीटरवर आमचा थांबा होता. त्यात पाठीवर पाणी, खाण्याचे आणि प्रथमोपचाराचे साहित्य घेऊन आम्ही मार्गक्रमण करत होतो. पहिल्या सात तासात ३० किलोमीटरचे अंतर गाठले. तेव्हा उर्वरित पाच तासात २१ किलोमीटर अंतर गाठता येईल का, ही शंका होती. पण वेळेच्या काही मिनिटेआधी हे अंतर गाठले.