यूपीएससी परीक्षेसाठी सुविधांचा अभाव
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यंदा विदर्भातील मुलांनी चांगले यश संपादन केले. देशातील या सर्वोच्च नागरी परीक्षेत अत्याधुनिक सुविधांची कमतरता आणि उच्च शिक्षणाचा अभाव असलेल्या ग्रामीण भागातील मुलांनी उल्लेखनीय कामगिरी करून बुद्धिमत्ता आणि कठोर परिश्रमाला पर्याय नसल्याचे पुन्हा एकदा सिद्घ केले आहे.
विदर्भातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्य़ांतील मुलांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षण आणि ग्रामीण भागातून आल्याचा न्यूनगंड झुगारून गुणवत्तेच्या क्षेत्रात भरारी घेत ध्येयाला गवसणी घातली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतून प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवलेल्या या विद्यार्थ्यांच्या यशोगाथेमुळे शहरी आणि ग्रामीण शिक्षणाबद्दल निर्माण झालेला समज दूर होण्यास मदत होणार आहे. अत्यंत दुर्गम आणि आदिवासी भागातील संघमित्रा खोब्रागडे असो किंवा कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची तसेच मराठी माध्यमातून शिक्षण झालेला विनोद येरणे असो या दोघांनी जिद्दीपुढे आकाश ठेंगणे, असा संदेश दिला आहे.

सर्व गुणवंत जिल्हा परिषद शाळेतील
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवलेल्या नागपूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्य़ांतील सर्व गुणवंत मुलांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतून प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवलेल्या या विद्यार्थ्यांच्या सर्वोच्च नागरी सेवा परीक्षेतील यशाने शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांच्या गुवणत्तेबद्दल कल्पना भ्रामक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विनोद येरणे
नागपूर जिल्ह्य़ात मौदा तालुक्यातील बोरी (सिंगोरी) या छोटय़ाशा खेडय़ातील विनोद येरणे यांनी अपयशाने खचून न जाता परिश्रमातील सातत्य कायम ठेवले. सातव्या प्रयत्नात त्याने यश संपादन केले. अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा विज्ञान शाखेतील आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्याला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे शिखर गाठता येते. या प्रवादांना खोटे ठरवले आहे. जेमतेम शेती आणि कुटुंबाची गुजराण केवळ शेतीवर असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या विनोदचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. गावात सातवीनंतर शाळा नसल्याने तालुक्यातील तारसा येथे १० वी पर्यंतचे शिक्षण घेतले. पुढील शिक्षण गावापासून १० कि.मी. अंतरावरील सालवा या गावी घेतले, तर कला शाखेतील पदवीचे शिक्षण (बी.ए.) कन्हान येथे घेतले. त्यासाठी तो सायकलने ये-जा करत होता. पदवीचे शिक्षण झाल्यावर वडील वारले. आईवर शेतीचा भार आला. त्यामुळे तिला मदत करावी लागत होती. मोठा भाऊ नगरधन येथे खासगी कंपनीत नोकरीला आहे. लहान भाऊ विमा एजन्सीचे एजन्ट चे काम करतो. लोकसेवा आयोगाची मराठी माध्यमातून परीक्षा दिली. बर्डी येथील पूर्व भारतीय प्रशासकीय सेवा केंद्रात काही दिवस तयारी केली. कोल्हापुरात एक वर्षे तयारी आणि दोन वर्षांपासून पुण्यात तयारी करत असताना हे यश संपादन झाले. प्रत्येक प्रयत्नानंतर जिद्द वाढत गेली आणि सातव्या प्रयत्नाला यश हाती लागले. दरम्यानच्या काळात अर्थार्जनासाठी उन्हाळ्यात विवाह सोहळ्याचे व्हिडिओ शूटिंग करत होतो. दोघेही भाऊ त्यांना जमेल तेवढी मदत करत होते, पण त्यांनी माझा धीर खचू दिला नाही. त्यामुळे या यशाचे श्रेय त्यांना जाते, असेही तो म्हणाला. त्याचा गुणानुक्रम ७०९ आहे. तो भारतीय महसूल सेवेसाठी पात्र ठरला आहे. नागपुरातील प्री-आएएस सेंटरमध्ये पाहिजे तसा माहोल नाही. त्यामुळे येथील मुलांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या तयारीसाठी इतर ठिकाणी जावे लागते, असेही तो म्हणाला.

संघमित्रा खोब्रागड
संघमित्रा खोब्रागडे हिचा गुणानुक्रम ८३२ आहे. अत्यंत सामान्य कुटुंबातील आलेल्या संघमित्राने अथक परिश्रमाने यशाचे शिखर गाठले आहे. तिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यानंतर १२ पर्यंतचे शिक्षण गडचिरोली येथील शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात झाले. पुण्यात अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर तेथेच नागरी सेवा परीक्षेची तयारी केली. यापूर्वी तिला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश प्राप्त झाले आहे. सध्या ती प्रशिक्षण घेत आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यशाबद्दल बोलताना ती म्हणाली, निवड यादीमध्ये नाव बघून खूप आनंद झाला. माझ्या आयुष्यातील ध्येय गाठण्यासाठीचे ते एक माध्यम म्हणून त्याकडे बघते. ज्या सर्वानी माझ्या यशासाठी मदत केली त्यांचे खूप मनापासून आभार मानते.

शुभम ठाकरे
दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी झालेला शुभम ठाकरे याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्याचे आई-वडील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक. वडील सेवानिवृत्त झाले आहेत. शुभमने अमरावती जिल्ह्य़ात दर्यापूर तालुक्यातील गायवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पाचवीपर्यंत शिक्षण घेतले.
पाचवी ते १२ पर्यंतचे शिक्षण प्रबोधन विद्यालय, दर्यापूर येथे झाले. पुण्याला बी.टेक. केल्यानंतर येथील ज्ञान प्रबोधिनीत नागरी सेवा
परीक्षेची तयारी केली. पहिल्या प्रयत्नात मुलाखतीपर्यंत मजल मारली होती, पण कमी गुण पडले. यावेळी मात्र त्याने
यशश्री खेचून आणली. त्याचा गुणानुक्रम ८१७ आहे. त्याला भारतीय महसूल सेवेत दाखल होता येणार आहे. या सेवेत दाखल होऊन भारतीय प्रशासकीय सेवेची तयारी करण्याचा मानस त्याने व्यक्त केला.

नितीश पाथोडे
नितीश पाथोडे याचे आई-वडील शिक्षक असून त्याचे प्राथमिक शिक्षण चंद्रपूर जिल्ह्य़ातील सिंदेवाही येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले आहे. त्याला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत गुणानुक्रम ७२३ प्राप्त झाला आहे. सिंदेवाही येथील १२ वी पर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर त्याने रायगड जिल्ह्य़ातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतली. त्यानंतर त्याने पुण्यात राहून नागरी सेवा परीक्षेची तयारी केली. त्याला तिसऱ्या प्रयत्नात यश मिळाले आहे. याआधीच्या दोन प्रयत्नामध्ये तो मुलाखतीपर्यंत पोहोचला होता, पण अंतिम यादीत त्याला स्थान मिळवता आले नव्हते. यावेळी मात्र त्याला यश संपादन होईल, अशी आशा होती. यापूर्वी तो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी झाला असून महापालिका मुख्याध्याधिकारी म्हणून त्याची निवड झाली आहे.