विदर्भातील संशोधकांना सुवर्णसंधी, ७ कोटी रुपयांच्या खर्चातून उभारणी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला ‘रूसा’ अंतर्गत २० कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. याअंतर्गत ७ कोटींचे ‘रूसा भवन’ येथे उभारण्यात येत आहे. यासाठी कोटय़वधींची आत्याधुनिक उपकरणेही खरेदी करण्यात आली असून यामुळे विदर्भातील संशोधकांना मोठी मदत होणार आहे.

राज्यातील विद्यापीठे व उच्च शिक्षणाच्या विकासासाठी केंद्र सरकारने घोषित केलेल्या ‘राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियाना’मुळे (रूसा) राज्याला हजारो कोटींचा निधी मिळण्याची शक्यता आहे. नागपूर विद्यापीठाला रुसा योजनेतून २० कोटींचा देण्यात आला आहे. त्यानुसार विद्यापीठाने विविध कामांचा आराखडा तयार केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारची थेट मदत मिळाल्याने विविध विकासकामांना गती मिळणार आहे. याचा विद्यार्थ्यांना सरळ लाभ मिळण्यासाठी आत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असे संशोधन केंद्र उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे. विद्यापीठाने ७ कोटींच्या रूसा भवनचे बांधकाम सुरू केले आहे. अमरावती मार्गावरील विद्यापीठ परिसरातील या रूसा भवनमध्ये ‘रूसा मल्टीफॅसिलिटी सेंटर’ उभारले जाणार आहे. यामध्ये प्रत्येकी दीड कोटी किंमतीच्या दोन अत्याधुनिक मशीन घेण्यात आल्या आहेत. या अत्याधुनिक उपकरणांच्या माध्यमातून संशोधकांना मदत मिळणार आहे. नागपूर विद्यापीठामध्ये चारशेहून अधिक महाविद्यालये संलग्नित आहेत. तसेच विदर्भातील हे सर्वात मोठे विद्यापीठ आहे. त्यामुळे येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह संशोधकांची संख्याही मोठी असते. मात्र, तंत्रज्ञानाची आणि उपकरणांची कमतरता असल्याने दर्जेदार संशोधनाला त्याचा फटका बसतो. त्यामुळे विद्यापीठाने ‘रूसा’ अंतर्गत विद्यार्थ्यांना संशोधनाची नवीन संधी उपलब्ध करून दिली आहे. नागपूर विद्यापीठ संशोधनामध्ये पिछाडीवर आहे, अशी अनेकदा ओरड केली जाते. तसेच येथे दर्जेदार संशोधन होत नसल्याचाही आरोप होतो. त्यामुळे विद्यापीठाने हे पाऊल उचलले आहे. संशोधन केंद्रासाठी विद्यापीठाने किमान पाच कोटींची नवीन उपकरणेही खरेदी केली आहे. यामध्ये एलसीएमएस, जीसीएमएस इन्स्ट्रय़ुमेंट, एक्सरे, आयआर, डीएससी अशा उपकरणांचा समावेश आहे. सध्या हे केंद्र विद्यापीठाच्या एका विभागामध्ये सुरू असून लवकरच नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन तेथे ते सुरू होणार आहे.

‘रूसा मल्टीफॅसिलीटी सेंटर’मधून विद्यार्थ्यांसाठी आत्याधुनिक उपकरणे खरेदी करण्यात आली आहेत. यातून संशोधनाला चालणार मिळणार आहे. नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असून ते लवकरच पूर्ण होणार आहे. – डॉ. राजेंद्र काकडे संचालक,रूसा मल्टीफॅसिलीटी सेंटर