नागपुरातील उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याला भेट
मास्टरब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने शनिवारी नागपूर जिल्ह्य़ातील उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याला भेट दिली. मात्र, वाघांनी भेटीची हुलकावणी दिली.
शुक्रवारी रात्रीच सचिन तेंडुलकर नागपुरात दाखल झाला आणि शनिवारी पहाटे ५.३० वाजता त्याने उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याचे प्रवेशद्वार गाठले. सचिनच्या या अभयारण्याच्या भेटीबाबत अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती. सकाळी सचिनने अभयारण्याला भेट दिल्याचे कळताच आणि दुपारी पुन्हा तो सफारी करणार असल्याचे समजल्यानंतर ते दुपारी नागपूरहून उमरेड-कऱ्हांडलासाठी रवाना झाले.
सचिनने खुल्या जिप्सीऐवजी बंद गाडीतूनच सैर करणे पसंत केले. त्याच्या गाडीचे सारथ्य मानद वन्यजीव रक्षक रोहीत कारू याने केले. या अभयारण्यात वाघीण आणि तीन बछडे सध्या पर्यटकांचे आकर्षण आहेत, पण त्याहीपेक्षा नवेगाव-नागझिऱ्यातून आलेल्या जय या वाघाने पर्यटकांना साद घातली आहे. सफारीदरम्यान छायाचित्रण टाळणाऱ्या सचिनने ट्विटरवर मात्र त्याचा जंगलातील सेल्फी टाकला. यावेळी जंगलातील वनरक्षकांसोबत त्याने उत्साहाने छायाचित्र काढून घेतले.