राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन

कर्तृत्वामुळे भाषा विस्तारते. त्यामुळे आधी कोणत्याही क्षेत्रात कर्तृत्व गाजवा म्हणजे भाषेचा आपोआपचा विस्तार होईल, अशी लक्षवेधी मांडणी संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा.डॉ.सदानंद मोरे यांनी रविवारी येथे केली.

शिक्षक साहित्य संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या साडेतीन तासाच्या रटाळ कार्यक्रमात जो तो बोलण्याची आणि स्वत:च्या पुस्तकाचे प्रकाशन करण्याची हौस भागवत असताना प्रा. मोरे यांच्या वैचारिक मेजवानीमुळे कार्यक्रमाचे सार्थक झाल्याचा अनुभव आला. बुधवार बाजारातील संताजी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ काणे, तर अध्यक्षस्थानी प्रा. मोरे होते.

ते म्हणाले, शिक्षकांची साहित्यनिर्मिती इतरांपेक्षा सरस ठरू शकते. साहित्यनिर्मितीसाठी लागणारे वाचन, चिंतन, मनन या गोष्टी त्यांच्या दैनंदिन कामाचा भागच असल्याने साहित्यनिर्मितीसाठी त्यांच्याएवढी अनुकूल भूमिका कोणाचीही असू शकत नाही. शिक्षकांना ‘केजी टू पीजी’ या एकाच धाग्यात बांधणाऱ्या कार्यक्रमाचे त्यांनी स्वागत केले, तसेच साहित्यनिर्मितीमुळे शिक्षकांचे व्यक्तिमत्त्व समृद्ध होईल आणि मुलांना व समाजाला त्याचा फायदा होईल, असेही ते म्हणाले.

जीवनाएवढीच भाषेची व्याप्ती आहे. जो समाज कर्तृत्व वाढवतो त्याची भाषा विस्तारते. कर्तृत्वामुळेच भाषा विस्तारते. इंग्रजांच्या कर्तृत्वामुळे इंग्रजी भाषेचा विकास झाला. तसाच युरोपीय लोकांनी तंत्रज्ञानात कर्तृत्व गाजवले म्हणून आज सर्व तंत्रज्ञानात त्यांचे शब्द दिसून येतात. काही लोक ‘मोबाईल’ला भ्रमणध्वनी म्हणतात. मोबाईलचा शोध मराठी माणसांनी लावला असता तर भ्रमणध्वनी हा शब्द इंग्रज, फ्रेंच, अमेरिकन यांनी स्वीकारला असता, पण या क्षेत्रात आपले कर्तृत्वच नसल्याने भ्रमणध्वनी शब्द अप्रस्तुत असल्याचे मोरे म्हणाले. व्यासपीठावर बालभारतीचे अध्यक्ष नामदेव कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक शुभांगी भडभडे, जयदीप सोनखासकर, सुरेंद्र पाथरे, डॉ. गणेश चव्हाण, विजया मारोतकर आदी उपस्थित होते. यावेळी नामदेव कांबळे यांनी बोलीभाषा लोप पावत असून त्या वाचवण्यावर भर देण्याचे आवाहन केले, तर भडभडे यांनी शिक्षकांच्या समस्यांना हात घातला. चित्रा कहाते आणि वीणा राऊत यांनी संचालन केले.

अखिल भारतीय संमेलनातही एवढी पुस्तक प्रकाशने होत नसतील, तेवढी प्रकाशने या कार्यक्रमात पार पडली. संचालनकर्ते, आयोजनकर्ते, प्रास्ताविक, आभार मानणारे, आयोजन समितीतील प्रतिनिधी आणि गावोगावच्या इतरही शिक्षकांनी डॉ. काणे व प्रा. डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्याची संधी साधली. त्यामुळे कार्यक्रम बराच रेंगाळला.

विजय मारोतकर या शिक्षक राजमाता

आपल्या नोकऱ्या धोक्यात आहेत. नवनवीन जीआर येत आहेत. यापुढे मोठे भान ठेवून नोकरी करावी लागेल. आता २०-२० चे स्वप्न पहा आणि शिक्षकांनी पासपोर्ट तयार ठेवा. देशाबाहेर जाऊन आपल्याला शिक्षक संमेलन घ्यायचे आहे. येथे बसलेल्या प्रत्येकाला संमेलनाध्यक्षपदाचा मान मिळेल. या संमेलनासाठी राबणाऱ्या विजय मारोतकर या शिक्षक राजमाता आहेत.

जयदीप सोनखासकर, अध्यक्ष, शिक्षक साहित्य संघ