मुंबई-औरंगाबादऐवजी नागपूरला जागा
भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साई)’ विभागीय केंद्र गुजरातऐवजी महाराष्ट्रात करण्याचा निर्णय झाला असला तरी मुंबई-औरंगाबादला डावलून ते नागपूरला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा नागपूरलाच पसंती दिली असून त्यासाठी महापालिकेने सुमारे १४८ एकर जागा दिली आहे. त्याचे आरक्षण बदलण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंजुरी दिली. त्यामुळे हे केंद्र नागपूरला सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र त्यामुळे केंद्र सरकारला मोठा आर्थिक भार पडणार आहे.
महाराष्ट्र, गोवा, राजस्थान व गुजरात या राज्यांसाठी ‘साई’ चे विभागीय केंद्र गांधीनगर येथे आहे. महाराष्ट्रासाठी स्वतंत्र विभागीय केंद्र सुरु करण्यात येणार असल्याने मुंबई, औरंगाबाद व नागपूर यापैकी ते कोठे असावे, यावर बरीच चर्चा झाली होती. मुंबई येथे साईचे उपकेंद्र असून विभागीय केंद्रासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याचे क्रीडा विभागाचे म्हणणे होते. पण औरंगाबाद येथे जागा व अन्य पायाभूत सुविधा असून केवळ ६० ते ७० कोटी रुपयांमध्ये विभागीय केंद्र सुरु होऊ शकते. त्यामुळे ते औरंगाबादला असावे,असा क्रीडामंत्री विनोद तावडे यांचा आग्रह होता.
पण मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अन्य नेत्यांनी हे केंद्र नागपूरलाच असावे, अशी भूमिका घेतल्याने ते नागपूरला करण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिकेने त्यासाठी १४८ एकर जागा दिली आहे.
मुंबईचे उपकेंद्र सुरुच नागपूरला विभागीय केंद्र झाले तरी मुंबईचे उपकेंद्र सुरुच राहील. नागपूरला गोवा, दीवदमण, दादरा-नगर हवेली हे संलग्न राहतील. या केंद्रामुळे खेळांसाठी सुविधा व पोषक वातावरण तयार होईल. औरंगाबाद व चंद्रपूर या खेळांसाठी स्वतंत्र छोटी केंद्रे सुरु केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.