स्मशानभूमीतील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रताप!

नागपूर : करोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कारासाठी दिलेल्या पीपीई किटची सफाई कर्मचाऱ्याकडून विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महापालिका प्रशासनाकडून अशा सफाई कर्मचाऱ्यांचा शोध घेतला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात करोनाबाधितांची व मृत्यूसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बाधितांचा मृत्यू रुग्णालयात झाल्यानंतर  घरी न नेता त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी रुग्णालयातून घाटावर आणले जाते. अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी ही सफाई कर्मचाऱ्यांकडे असते. त्यांना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून पीपीई किट दिल्या जातात. अशा कामासाठी महापालिकेत १० शववाहिका असून गेल्या काही दिवसात मृत्यू वाढल्याने ६ मिनी बसेसही शववाहिकेत रूपांतरित करण्यात आले आहे. त्यातून पार्थिव नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेत १६ शववाहिका असून प्रत्येक शववाहिकेमध्ये चार कर्मचारी असतात.

दिवसाला एका कर्मचाऱ्याला किमान चार ते पाच पीपीई किट दिल्या जातात. एका पार्थिवासाठी एक पीपीई किट याप्रमाणे कर्मचारी ते घालून अंत्यसंस्कार करतात. मात्र काही स्वच्छता कर्मचारी मात्र एक किंवा दोन पीपीई किटचा अंत्यसंस्कारासाठी दिवसभरात उपयोग करत. उरलेल्या किटची ५०० ते १ हजार रुपयाला विकत असल्याचे धक्कादायक वास्तव काही घाटावर समोर आले आहे.

साधारणत: बाधितांचे निधन झाल्यावर त्यांच्या कुटुंबातील सदस्य अंत्यसंस्कारासाठी जाऊ शकत नाही. जात असेल तर पीपीई किट घातल्याशिवाय त्याला परवानगी नसते. किमान अंत्यसंस्काराच्यावेळी आपल्या माणसाला बघावे असे वाटत असते. त्याचा फायदा घेत काही कर्मचारी मात्र अशा कुटुंबातील व्यक्तीला त्यांना मिळालेली किट विकत असल्याचे समोर आले आहे.

जीवाची पर्वा न करणारे कर्मचारी’

खरे तर करोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांचे सख्खे नातेवाईक, शेजारी आणि आप्तसुद्धा  जवळ जाण्याची हिंमत करत नाही. अशावेळी अनेक सफाई कर्मचारी जीवाची पर्वा न करता मृत बाधितांवर अंत्यसंस्कार करून कर्तव्य बजावत चांगले काम करत आहे.

घाटावर अंत्यसंस्कारासाठी मृतदेह पोहचवणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांकडून घाटावर किंवा रुग्णालयात पीपीई किटची विक्री केली  जात असेल  त्या संदर्भात कोणाची तक्रार आल्यास त्याची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाईल. – डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी, महापालिका