दिवसाला पाच-सात ग्राहक; भाडे, वेतनाएवढेही उत्पन्न नाही

नागपूर : सलून सुरू करण्याची परवानगी मिळून दहा दिवस झाले असले तरी करोनाच्या वाढत्या संकटामुळे  ग्राहक कमी झाले आहेत. त्यातच प्रशासनाच्या जाचक अटींमुळे सलून व्यावसायिकांवरील संकट कायम आहे. दिवसाला पाच ते सात ग्राहक येत असल्याने दुकानाचे भाडे, वीज बिल, कर्मचाऱ्यांचे वेतनही निघत नसल्याचे चित्र आहे.

करोनाच्या वाढत्या संकटामुळे टाळेबंदी जाहीर झाली. त्यामुळे तब्बल तीन महिन्यांपासून सलून बंद पडले. यामुळे व्यावसायिक मोठय़ा आर्थिक अडचणीत सापडले. मात्र राज्य सरकारने गेल्या महिनाभरापासून अटी लागू करून शिथिलता दिली. त्यामुळे सलून व्यावसायिकांच्या संघटनांनीही सरकारवर दबाव आणत सलून सुरू करण्याची मागणी केली. या व्यावसायिकांवरील संकट व आíथक बाजू पाहता अखेर २८ जून रोजी सरकारने सलून सुरू करण्याची परवानगी दिली. परंतु केवळ केशकर्तनाशिवाय इतर सर्व सेवा बंद ठेवण्याची अटही लागू करण्यात आली. त्यामुळे काही प्रमाणात व्यावसायिकांना दिलासा मिळाला. मात्र आता परवानगी मिळूनही ग्राहकांची संख्या रोडावल्याने सलून व्यावसायिकांच्या अडचणी मात्र कायम आहेत. केवळ केशकर्तन करून  खर्च भरून निघत नाही.  इतर खर्च  मोठा आहे. एकतर उन्हाळ्यात लग्नाचा सर्वात मोठा हंगाम टाळेबंदीमुळे  हातून गेला. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले.  आता करोनाच्या भीतीपोटी ग्राहक घटले. परिणामी दुकानाचे भाडे, कर्मचाऱ्यांचे वेतन, वेळोवेळी दुकान सॅनिटाईज करण्याचा अधिकचा खर्च, हातमोजे, पीपीई संचांचा खर्च वाढला आहे.

दरम्यान, महापालिकेचे अधिकारी दुकानात येऊन तपासणी करत असून नियम पाळले नाही तर एक हजार रुपयाचा दंडही ठोठावत आहेत. त्यामुळे जोपर्यंत सर्व सुविधा सुरू होणार नाही तोपर्यंत व्यवसाय पूर्वपदावर येणार नाही, असे व्यावसायिक सांगत आहेत.

इतर सेवा सुरू करण्याची परवानगी द्यावी 

केवळ केशकर्तन करून दुकानाचा खर्च निघणार नाही.  प्रशासनाने इतर सेवा सुरू करण्याची परवानगी द्यावी तेव्हाच आम्ही आíथक अडचणीतून बाहेर पडू. त्यासाठी आम्ही सर्व नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करू.

– अमोल आंबुलकर, सलून व्यावसायिक.