‘समाजमत’ व्यासपीठावर बंजारा समाजाची मागणी

लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर : विदर्भातील विविध जिल्ह्य़ातून नोकरी आणि व्यवसायाकरिता नागपुरात आलेल्या बंजारा समाजाला त्यांचे पारंपरिक उत्सव साजरे करण्यासाठी सांस्कृतिक सभागृह आणि शिक्षणासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलींकरिता वसतिगृह बांधण्यासाठी समाजातील महिलांनी पुढाकार घेतला आहे. मात्र, त्यांना शासनाकडून भूखंड मिळत नसल्याने अडचण येत आहे. या दोन्ही बांधकामांसाठी शासनाने भूखंड उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी  बंजारा समाजाच्या महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’च्या समाजमत व्यासपीठावर केली.

विदर्भाच्या विविध जिल्ह्य़ात विखुरलेल्या या समाजातील अनेक जण नोकरी-व्यवसायासाठी नागपुरात स्थायिक झाले आहेत. या समाजाची नागपुरात सध्या ५० हजारांहून अधिक लोकसंख्या आहे. हा शेती करणारा समाज आता शासकीय नोकरी आणि व्यवसायातही उतरला आहे. परंतु समाजाचा एका मोठय़ा भागाचा उदरनिर्वाह आजही शेतीवर अवलंबून आहे. हा समाज सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर अधिक भर देणारा आहे. ग्रामीण भागात पारंपरिक कार्यक्रमांच्या आयोजनास अडचणी येत नाही. जागा भरपूर असते. परंतु नागपूरसारख्या ठिकाणी त्यांच्यासमोर अडचणी येत आहेत. कार्यक्रमांसाठी सभागृह घेणे, ते वेळेवर मिळणे शक्य होत नाही. त्यामुळे समाजातील एका महिला संघटनेने राज्यसरकारकडे भूखंड मागितला. त्याच्या बांधकामासाठी ते खर्च करायला देखील तयार आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून भूखंडासाठीची फाईल मंजूर झालेली नाही.

या समाजात प्रामुख्याने तीज, होळी, दिवाळी मोठय़ा उत्साहाने साजरी केली जाते. याशिवाय सेवालाल महाराज यांची जयंती साजरी केली जाते. यासाठी समाजाला सांस्कृतिक भवन हवे आहे. त्यासाठी जागेची मागणी आहे. नागपुरातील विधान भवन परिसरात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पुतळा आहे. तेथे बंजारा समाजाच्या वतीने दरवर्षी जयंतीनिमित्त पुष्पहार घालून अभिवादन केले जाते. परंतु पुतळ्याला पुष्पहार घालण्याची व्यवस्था नाही. काठीच्या आधारे पुष्पहार घालावे लागते. येथे जिना बनवण्यात यावा. त्याचा खर्च समाज उचलण्यास तयार आहे, असे सतीसामकी माता बंजारा समाज महिला बहुउद्देशीय संस्थेच्या सचिव नलिनी उमेश पवार म्हणाल्या.

रोजगारासाठी आलेल्या महिलांसाठी आणि शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी नागपुरात वसतिगृह नाही. ते समाजाच्या वतीने उभारण्याची योजना आहे. तसेच समाजाच्या मालकीचे सांस्कृतिक सभागृह हवे आहे. त्यासाठी जमिनीची मागणी सरकारकडे केली आहे, असे सतीसामकी माता बंजारा समाज महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष जयश्री दुलसिंग राठोड यांनी सांगितले. यावेळी संस्थेच्या सदस्य राजश्री धीरज राठोड उपस्थित होत्या.