20 February 2019

News Flash

भिडेंच्या अटकेसाठी विरोधक आक्रमक

वियजस्तंभ, संभाजी महाराजांच्या स्मारकाचा प्रस्ताव

संभाजी भिडे (संग्रहित छायाचित्र)

भीमा-कोरेगाव दंगल घडवण्यामागे व लोकांची डोकी भडकावण्यामागे शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे असून ते आता संतांचाही अपमान करीत आहेत. त्यामुळे सरकारने त्यांना पाठीशी न घालता अटक करावी, अशी मागणी करीत विधान परिषदेत विरोधक आक्रमक झाले. या मागणीसाठी विरोधकांनी सभापतींच्या आसनापुढे येऊन सरकार विरोधी घोषणा दिल्याने सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.

भीमा-कोरेगाव दंगलीची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पूजा सकट हिचा खून करून तिचा मृतदेह विहिरीत टाकण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणात आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली, तर उर्वरित सात आरोपी मोकाट आहेत. हे चुकीचे असून या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करून संबंधितांना अटक करावी, अशी मागणी आमदार अ‍ॅड. जयदेव गायकवाड, प्रा. जोगेंद्र कवाडे, प्रकाश गजभिये यांनी केली. तर भीमा-कोरेगाव येथे उसळलेल्या दंगलीची चौकशी पूर्ण झाली का आणि दंगल भडकावण्यामागे असलेल्यांना अटक करा, अशी मागणी करणारा प्रश्न आमदार शरद रणपिसे, भाई जगताप, सुनील तटकरे, विद्या चव्हाण यांनी उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, या प्रकरणात दोन सदस्यीय न्यायालयीन चौकशी सुरू आहे. या चौकशीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल. भिडे यांच्या वक्तव्याशी शहानिशा व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्यावर कारवाई करू. या उत्तरावर विरोधकांनी नाराजी व्यक्त केली व सरकार भिडेंना पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत सरकारविरोधी घोषणा दिल्या.

वियजस्तंभ, संभाजी महाराजांच्या स्मारकाचा प्रस्ताव

भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभ आणि वडू येथील संभाजी महाराजांचे स्मारक यांच्या विकासाकरिता पुणे जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कामासाठी २५ कोटी रुपये देण्यात येतील. दंगलीत स्थानिक लोकांच्या घरांची तोडफोड करण्यात आली. यात त्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे स्थानिकांना ९ कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे पुरावे

या प्रकरणात माओवादी चळवळीशी संबंध असलेल्यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांना ते चळवळीचे पुरस्कर्ते असल्यामुळे नव्हे तर  माओवादी कारवायांचा कट रचण्यात सहभागी असल्याचे अनेक दस्तावेज सापडल्याने कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

 

First Published on July 12, 2018 1:32 am

Web Title: sambhaji bhide 2