विमानाने प्रवास करणारा प्रवासी श्रीमंत असून त्याच्याकडून अधिकची रक्कम घेतली तरी काही बिघडत नाही, अशी मानसिकता बहुधा विक्रेत्यांची झाल्याने नागपूर विमानतळावर एक प्लेट समोसा १४० रुपयांना विकला जातो. यावर कळस म्हणून की काय दरपत्रकापेक्षाही अधिक शुल्क आकारून त्यांचे देयक प्रवाशांना दिले जात आहे.

विमानतळावरील समोसा खायची इच्छा झाल्यास आधी खिसा तपासून घ्या. कारण येथे समोसा २० किंवा ३० रुपये प्लेट नाही तर १४० रुपये प्लेट आहे. एका समोशाकरिता ७० रुपये मोजावे लागतात. कुटुंबासोबत तुम्ही असाल आणि तीन प्लेट समोसे बोलावले तर ४२० रुपये द्यावे लागतील. अशाप्रकारे नागपूर विमानतळावर खाद्यपदार्थ विक्रीतून प्रवाशांचा खिशा कापल्या जात आहेत. विमानतळावरील कॉफी स्टॉलवरील दरपत्रकावरही विश्वास ठेवण्यासारखे नाही. त्यावर एका समोसा ६० रुपयांचा आहे. प्रत्यक्षात ६७ रुपये घेण्यात येते. तीन रुपये जीएसटी आकारली जाते. विमानतळावर एक नग समोशाचा दर ६६.६६ आणि जीएसटी ३.३३ रुपये असे एकूण ६९.९९ रुपयांचा एक समोसा विकण्यात येत आहे.

नागपुरातील काही प्रवाशांनी ‘लोकसत्ता’शी संपर्क साधून जादा दराने विक्री होत असलेल्या खाद्यपदार्थाबाबत तक्रार केली. विमानतळावर पदार्थाचे दर मुळातच अधिक आहे. मात्र, त्याहूनही जास्त पैसे ग्राहकांकडून वसूल केले जातात, असे आशुतोष दाभोळकर म्हणाले.

विमान प्रवास आता श्रीमंत वर्गापुरता मर्यादित राहिला नाही. अलीकडे त्यातून मध्यवर्गीय प्रवास करू लागले आहेत. प्रवाशांची संख्या वाढावी म्हणून विमान कंपन्यांनीही त्यांच्या तिकीट दरात कपात केली, परंतु विमानतळावरील खाद्यपदार्थाचे दाम मात्र बाजारात मिळणाऱ्या किंमतीपेक्षा कित्येक पटीने अधिक आहे हे येथे उल्लेखनीय.

नागपूर विमानतळावरील खाद्यपदार्थाचे दर फलक

चहा- ४० रुपये

कॉफी – ८० रुपये

वेज सँडविच- १२५ रुपये

वेज ग्रिल्ड सँडविच- १३५ रुपये

चीज सँडविच- १३५ रुपये

वेज समोसा/ बोंडा- ६० रुपये

वेज कटलेट- ७५ रुपये

वेज उपमा- ७५ रुपये

इडली- ६० रुपये

वेज उपमा- ७० रुपये

मेडुवडा/ सांभार- ७० रुपये