नागपूर : भावावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याने पोलीस हवालदारावर हल्ला करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन वाळू माफियांना नागपूर ग्रामीण पोलिसांनी ४८ तासाच्या आत जेरबंद केले.

कमलेश हरिचंद मेश्राम (३०), रा. इंदिरानगर, कन्हान आणि अमान अनवर खान (१९), रा. संताजीनगर, कन्हान अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. रवि तुळशीराम चौधरी असे जखमी पोलीस हवालदाराचे नाव असून ते कन्हान पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. आरोपी हे वाळू माफिया आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाळू माफियांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर रवि चौधरी यांनी कमलेशच्या भावावर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. याचा राग त्याच्या मनात होता. दरम्यान १६ सप्टेंबरला रवि यांच्याशी संपर्क साधून त्याच्या भावाला माफी मागायची असल्याचे कमलेशने सांगितले. त्याकरिता रात्री ८.३० वाजता रवि यांना गहू हिवरा चौक परिसरात बोलावून घेतले. आरोपींनी कट रचून चाकूने त्यांच्या पोटावर व मांडीवर वार करून खून करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी पळून गेले. रवि यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपुरात हलवण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला.  अधीक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींना पकडण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक अनिल जिट्टावार, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र गौरखेडे, जावेद शेख, लक्ष्मीप्रसाद दुबे, नाना राऊत, नीलेश बर्वे, सुरेश गाते, दिनेश आधापुरे, शैलेश यादव, सत्यशील कोठारे, अमोल वाघ, प्रणय बनाफर, वीरेंद्र नरड, विपीन गायधने, साहेबराव बहाळे आणि अमोल कुथे यांनी फरार असलेल्या आरोपींचा दिवसरात्र शोध घेऊन ४८ तासांच्या आतमध्ये अटक केली. त्यांना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यानी पोलीस कोठडी सुनावली.