राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री नागपुरात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेऊन त्यांच्याशी वरील मुद्यावर चर्चा केली.चर्चेत सरसंघचालकांनी युती कायम राहावी, असे मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे समजते.

राज्यात सत्तास्थापनेवरून सेना व भाजपमध्ये ओढाताण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सरसंघचालकांची घेतलेली भेट महत्त्वपूर्ण आहे. सोमवारी दिल्लीत पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सत्तास्थापनेसाठी हालचाली जोरात सुरू केल्या आहेत. मंगळवारी मुंबईत भाजप नेत्यांची बैठक आटोपल्यावर मुख्यमंत्री रात्री ९ वाजता नागपुरात आले. सुमारे दीड तास त्यांनी तेथे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली. त्यात राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, सेनेचा मुख्यमंत्रीपदासाठी आग्रह आणि भाजपची भूमिका याबाबत डॉ. भागवत यांना माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

शिवसेनेला सोबत घ्यायचे की त्यांच्याशिवाय सत्तास्थापन करायची, या मुद्यावर चर्चा झाली असता सरसंघचालकांनी युतीच्याच बाजूने कौल दिल्याची माहिती आहे.