पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात वीरमरण

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले संजय राजपूत यांनी सैन्यात २० वर्षांची सेवा दिल्यानंतरही स्वेच्छानिवृत्ती न घेता देशसेवा करण्याचा निर्णय घेतला. श्रीनगरला जाण्याचे आदेश आले आणि तिकडे निघण्याचा दिवस उजाडला. घरी ११ वर्षांचा धाकटा मुलगा तापाने फणफणत होता. मात्र संजय यांनी पत्नीला मुलाची काळजी घेण्याची सूचना केली व मनावर दगड ठेवून ते कर्तव्यावर निघाले. परंतु गंतव्यावर पोहोचण्याआधीच त्यांना वीरमरण प्राप्त झाले.

नागपुरातील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कॅम्प वसाहतीत संजय राजपूत (४५) राहत होते. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफचे वाहन उडवल्याचे वृत्त गुरुवारी दुपारी आले आणि सीआरपीएफ वसाहत हादरली. या वसाहतीतील क्वॉर्टर क्रमांक २१९ मध्ये राहणारे संजय राजपूत हे या हल्ल्यात  शहीद झाल्याचे रात्री उशिरा त्यांच्या कुटुंबाला कळले. शेगाव  येथे राहणारे  मोठे भाऊ राजेश राजपूत यांनी आणि बुलाढाणा जिल्ह्य़ातील मलकापूर येथील नातेवाईकांनी नागपूरकडे धाव घेतली. शहीद संजय राजपूत यांची पत्नी सुषमा (३८) यांना या घटनेने मोठा धक्का बसला आहे.  संजय राजपूत यांना जय (१३) आणि शुभम (११) दोन मुले आहेत. कॅम्पमधील लोक आणि नातेवाईक आज दिवसभर सुषमा यांचे सांत्वन करीत होते. लोकांना आईचे सांत्वन करताना बघून मुलांच्या डोळ्यात अश्रू दाटून येत होते. येथील वातावरण हृदयाला पिळ घालणारे होते.  संजय राजपूत यांनी सेवा वाढवून घेतली होती. ते नागपूर कॅम्पमध्ये २१३ बटालियनमध्ये चार वर्षांपासून कार्यरत होते. त्यापूर्वी ते छत्तीसगडमध्ये सहा वर्षे होते. त्याच्याही आधी त्यांनी ईशान्येकडील राज्यात १० वर्षे सेवा दिली होती. ते नागपुरातून ११ फेब्रुवारीला मध्यरात्री २ वाजता रेल्वेगाडीने जम्मूकडे निघाले. परवा ते जम्मूत पोहोचले. गुरुवारी पहाटे तीन वाजता ते श्रीनगरकडे बसने निघाले. त्यांच्याशी पहाटे तीन वाजताच्या सुमारास भ्रमणध्वनीवरून बोलणे झाले. वाटेत असल्याचे त्यांनी सांगितले, अशी माहिती त्यांचे मोठे बंधू राजेश राजपूत यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.

आज सकाळी पार्थिव येणार

शहीद संजय राजपूत यांचे पार्थिव एअर इंडियाच्या विमानाने शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास नागपुरात आणले जाईल. तेथे सशस्त्र दलाकडून मानवंदना दिली जाईल. यावेळी विमानतळ सशस्त्र दलाचे अधिकारी आणि त्यांचा मोठा भाऊ राजेश राजपूत, काका, मेहुणा (साळा) उपस्थित असतील. येथून मोटारीने मलकापूरला पार्थिव नेण्यात येणार आहे. मलकापूर येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येतील.