महेश बोकडे, नागपूर

विदर्भ आणि त्यातही नागपूर म्हटले की डोळ्यासमोर येतात ते झणझणीत सावजी पदार्थ. रस्सा ही सावजीची खरी ओळख. हा रस्साही साधासुधा नाही. तो खाताना डोळ्यात पाणी आणि तोंडातून चक्क सूंसूं असा आवाज निघतो. या रस्स्यावरच्या तेलामुळे ठसका बसला नाही, असे कधी होत नाही. अशा या विदर्भातील झणझणीत ‘सावजी’ला टाळेबंदीने ग्रासले असून या व्यवसायाचा एकंदर तोटाही कोटींच्या घरात आहे.

सावजी म्हणजे केवळ मांसाहारी पदार्थ नाहीत. डाळकांदा, पाटवडी, खाकसची भाजी, भरल्या वांग्याची भाजी हे पदार्थसुद्धा ‘सावजी’मध्येच मोडतात. नागपूरला येऊन जो सावजी न खाता परत जातो तो खवय्याच नाही, असे गमतीने म्हटले जाते.  या वर्षी खासदार सांस्कृतिक महोत्सवात सहभागी झालेला जगप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने आवडीने हे पदार्थ मागवले होते. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे बडे नेते, अभिनेते, व्यावसायिक अनेक जण या पदार्थाचे खास चाहते आहेत. ते नागपुरात आल्यावर हमखास या पदार्थावर ताव मारतात. पंचतारांकित हॉटेलच्या मेन्यूकार्डमध्येही सावजी डिशने स्थान पटकावले आहे. अशा या नागपूरच्या प्रसिद्ध खाद्य ब्रॅण्डला टाळेबंदीचा मात्र फटका बसला  आहे.

श्रावण महिन्याचा अपवाद सोडला तर उर्वरित काळात या पदार्थाची मागणी वाढतीच असते. उन्हाळ्याच्या सुट्टय़ांमध्ये आणि विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान त्यात अनेकपटींनी वाढ होते.

शहरात सुमारे ३५० ते ४५० सावजी खाणावळी आहेत. एका खाणावळीचा महिन्याचा व्यवसाय हा सरासरी २.५० लाख ते ३.५० लाखांचा असतो. उन्हाळ्यात ही उलाढाल महिन्याला चार ते पाच लाखांवर जाते. मागील वर्षी उन्हाळ्यात २.५० ते ३ कोटी रुपयांचा व्यवसाय झाला होता.

यंदा उन्हाळ्याचा पूर्ण हंगाम टाळेबंदीत गेला. पुढचे काही महिने हा व्यवसाय सुरू होण्याची शक्यता नाही, असे या क्षेत्रातील व्यावसायिक मधु निमजे यांनी सांगितले. त्यांचे गोळीबार चौकात दुकान आहे. खासदार महोत्सवाला आलेल्या सचिनला त्यांच्याच दुकानातून सावजीचे पार्सल पाठवण्यात आले होते, असे निमजे यांनी सांगितले.

सावजी खाद्यपदार्थाला मोठा इतिहास आहे. पूर्वी नागपुरात मोठय़ा संख्येने कापड गिरण्या होत्या तेव्हा मध्य प्रदेशातून काही हलबा कोष्टी बांधव कामासाठी नागपूरमध्ये आले आणि येथेच स्थायिक झाले. सुट्टीच्या दिवशी रात्री ते सर्व मिळून एकत्र जेवायचे. त्यातूनच सावजी पदार्थाचा जन्म झाला. पुढे गिरण्या बंद झाल्या. पोटापाण्यासाठी काही लोकांनी ‘सावजी’ पदार्थाच्या खानावळी सुरू केल्या.

मार्चच्या दुसऱ्या आठवडय़ापासून दुकाने, खाणावळी बंद आहेत. जुलैपर्यंत टाळेबंदी व करोनाची भीती दूर होण्याची शक्यता कमीच आहे. त्यानंतर श्रावण महिना सुरू होईल. या काळात दुकाने बंदच असतात. म्हणजे आता खरा व्यवसाय हा दिवाळीनंतरच सुरू होईल, असे मधुजी निमजे सांगतात.