‘कारवाईची माहिती वर्तमानपत्रातून कळली’

खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकाल्यानंतर पहिल्या सार्वजनिक कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत हजेरी लावली होती, याची आठवण करून देत काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी चव्हाण हे जातीयवादी शक्तींना पाठबळ देत असल्याचा आरोप केला.

पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत प्रदेश काँग्रेस समितीने अलीकडेच चतुर्वेदी यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यावर प्रथमच   प्रतिक्रिया देताना चतुर्वेदी यांनी अशोक चव्हाण यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. चतुर्वेदी यांच्यावर कारवाई होण्याच्या काही दिवसआधी गडकरी हे चतुर्वेदी यांच्या महाविद्यालयात गेले होते. त्यामुळे चतुर्वेदी आणि गडकरी यांच्या संबंधाबाबत तर्कविर्तक लावले जात होते. त्यावर खुलासा करताना चतुर्वेदी यांनी अराजकीय कार्यक्रमात वेगवेगळ्या पक्षाचे लोक एकत्र येत असतात, असे सांगून चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष झाल्यावर नागपूर जिल्ह्य़ातील मौदा येथील एका कार्यक्रमात गडकरीसोबत होते, याकडे लक्ष वेधले.  जातीयवादी शक्तींना बळ देण्यासाठी माझ्याविरुद्ध नागपूर आणि मुंबईतील काँग्रेसचे काही नेते षडयंत्र रचत आहेत. पक्षातून बडतर्फ झाल्याचे वर्तमान पत्रातून कळले. याबाबत प्रदेश काँग्रेसकडून कुठलेही पत्र प्राप्त झाले नाही, असा दावाही चतुर्वेदी यांनी केला. पक्षातून बडतर्फ करताना नोटीस दिली जाते. प्रदेश काँग्रेसने आपल्याला  नोटीस दिली. शहर काँग्रेसची नोटीस देण्याची आणि एका वरिष्ठ नेत्यांची चौकशी करण्याची क्षमता नाही. शिवाय शहर काँग्रेसच्या कारणे दाखवा नोटीससोबत प्रदेशाध्यक्षांचे पत्र नाही. त्यामुळे ही संपूर्ण कारवाई अवैध आहे, असा दावाही चतुर्वेदी यांनी केला.

काँग्रेस कार्यकर्ता म्हणून काम करणार

विद्यार्थीदशेपासून आतापर्यंत काँग्रेसमध्ये आहे. पक्षाने मंत्रीपद आणि पक्षात विविध पदांवर काम करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे काँग्रेस सोडून इतर पक्षात जाणार नाही. आपल्यावर झालेल्या अन्यायकारक कारवाईबाबत पक्षश्रेष्ठी आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांना       वस्तुस्थिती अवगत करून देईन.  संघ मुख्यालय असलेल्या नागपुरात काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करीत राहीन. कार्यकर्ता पदावरून कुणीही मुक्त करू शकत नाही, असेही चतुर्वेदी म्हणाले.