News Flash

सतीश चतुर्वेदींचा फेरप्रवेश काँग्रेससाठी लाभदायक की तापदायक?

पाच वेळा आमदारकी भूषविलेल्या चतुर्वेदी गेल्या सलग दोन निवडणुकांमध्ये पराभूत झाले आहेत.

सतीश चतुर्वेदी

राजेश्वर ठाकरे, नागपूर

तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर जाहीर सभेत शाई फेकल्याच्या प्रकरणात ठपका ठेवून निलंबित करण्यात आलेले वादग्रस्त काँग्रेसनेते सतीश चतुर्वेदी यांचा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये झालेला पुनर्प्रवेश पक्षासाठी लाभदायक ठरणार की पुन्हा गटबाजीला ऊत येणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.

आधी २०१४ मधील लोकसभा निवडणूक, त्यानंतर विधानसभा आणि २०१९ मधील लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवामुळे काँग्रेसमध्ये निराशेचे वातावरण आहे. काँग्रेसच्या या अवस्थेमागे पक्षातील गटबाजी हे प्रमुख कारण मानले जाते. दीड वर्षांपूर्वी सतीश चतुर्वेदी यांचे निलंबन हेसुद्धा गटबाजीचे रूपांतर द्वेषात झाल्याचा परिपाक होता. शहर काँग्रेसवर वर्चस्व राखण्यासाठी मुत्तेमवार व चतुर्वेदी गटात असलेल्या चढाओढीतूनच चतुर्वेदी यांच्या कार्यकर्त्यांने महापालिका निवडणुकीदरम्यान तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या जाहीर सभेदरम्यान शाई फेकून त्यांना अपमानित केले होते. एवढेच नव्हे तर नागपूर महापालिकेच्या निवडणुकांमध्ये बंडखोरांना प्रोत्साहन देऊन पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका होता. त्यामुळे चतुर्वेदी यांची पक्षातून हकालपट्टी झाली होती. निलंबनाचे प्रकरणच मुळी गटबाजीमुळे उद्भवले होते. आता प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्यांचे निलंबन मागे घेतले आहे. याचा फायदा पक्षाला विधानसभा निवडणुकीत होईल की त्यांच्या पक्षात परतण्यामुळे पुन्हा शहरात गटबाजी वाढून पक्षाचे नुकसान होईल हे काळच ठरवणार आहे. नेत्यांवर शाई फेकणाऱ्यांनाही माफ केले जात असेल तर पुढे डांबर फेकूनही कारवाई होणार नाही, ही शहर काँग्रेसमधील एका नेत्याची यासंदर्भातील प्रतिक्रिया बोलकी आहे.

पाच वेळा आमदारकी भूषविलेल्या चतुर्वेदी गेल्या सलग दोन निवडणुकांमध्ये पराभूत झाले आहेत. दोन्ही निवडणुकीत  दोन वेगवेगळ्या मतदारसंघांत आणि तुलनेने कमकुवत मानल्या जाणाऱ्या उमेदवारांनी त्यांचा पराभव केला होता. त्यामुळे त्यांची राजकीय ताकद निर्णायक राहिली असे म्हणण्यासारखी स्थिती नाही. चतुर्वेदी यांना पुन्हा पक्षात प्रवेश देण्यासाठी मुत्तेमवार विरोधी गट सक्रिय होता. त्यांनी दिल्लीतील नेत्यांची याबाबत वेळोवेळी भेटही घेतली होती.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपुरात आहे. त्यांच्या मदतीने भाजपने येथे कार्यकर्त्यांचे जाळे विणले. तेव्हा त्यांचा सामना करण्यासाठी काँग्रेस एकजूट असावी म्हणून तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुत्तेमवार यांना झुकते माप दिले होते. परिणामी अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्षपदावर असेपर्यंत चतुर्वेदी यांना पक्षात फेरप्रवेश देण्यात आला नव्हता. बाळासाहेब थोरात यांनी चतुर्वेदी यांना पुन्हा पक्षात घेतले. थोरात यांनी बेरजेच्या राजकारणात सर्वाना बरोबर घेण्यावर भर दिला आहे.

पक्षात असताना चतुर्वेदी यांनी प्रदेश काँग्रेसने दिलेल्या कार्यक्रमापासून फारकत घेतली होती. शेतकरी संघर्ष यात्रा, विधान भवनावर मोर्चा आणि इतर पक्षवाढीसाठी आयोजित कार्यक्रमापासून ते दूर राहिले. प्रदेश काँग्रेसने चंद्रपूरमध्ये आयोजित केलेल्या सभेच्या विरोधात समांतर सभा माजी खासदार नरेश पुगलिया यांनी आयोजित केली होती. त्या सभेला चतुर्वेदी आर्वजून उपस्थित होते.

राज्याच्या पक्ष प्रमुखांवर शाई फेकण्याच्या गंभीर प्रकरणात ठपका ठेवूनही चतुर्वेदी यांना पक्षाने माफ केले असेल तर पक्षात शिस्त राहणार नाही. वरिष्ठांविरुद्ध काही केले तरी चालते, असा संदेश कार्यकर्त्यांमध्ये जाईल, असे काही नेत्यांना वाटते. कारण, निलंबनाआधी चव्हाण यांनी, बंडखोर उमेदवारांना रसद पुरवणे, पक्षाची शिस्त मोडणे आदींबाबत शहराध्यक्षांमार्फत चौकशी केली होती. त्यासंदर्भातील पुरावे आणि अहवाल बघितल्यानंतर सहा महिन्यांनी निलंबनाचा निर्णय घेण्यात आला होता. याचा अर्थ मग शिस्तभंगापूर्वी बजावलेली नोटीस, त्यासंदर्भातील अहवाल. पक्षश्रेष्ठींनी दिलेले आदेश याला काही अर्थ नाही काय, असा सवाल उपस्थित आहे.

जे पक्षाचे काम करण्यास इच्छुक असतील, त्या सर्वाचे पक्षात स्वागत केले पाहिजे. चतुर्वेदींच्या बाबतीतही हेच अपेक्षित आहे. नेता चांगला की वाईट, असे म्हणण्याची ही वेळ नाही.

– डॉ. नितीन राऊत, कार्याध्यक्ष, प्रदेश काँग्रेस.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2019 4:41 am

Web Title: satish chaturvedi is beneficial or inconvenient for the congress zws 70
Next Stories
1 आधीच वाढती बेकारी, त्यात मंदीची भर!
2 पाणी कपातीची पिडा १५ दिवस टळली
3 स्मार्ट सिटी मानांकनात नागपूर दुसऱ्या स्थानी
Just Now!
X