वाईल्डलाईफ कन्झर्वेशन सोसायटीचा अहवाल

आशियातील वाघांचे भविष्य हे लोकसंख्येच्या संक्रमणावर अवलंबून आहे. वाघांचा माणसांशी जितका अधिक संबंध येईल, तितके वाघ धोक्यात येतील. शहरीकरणाचा वेग बघता भविष्यात असे घडण्याची दाट शक्यता आहे, अशी भीती वाईल्डलाईफ कन्झर्वेशन सोसायटीच्या अभ्यासकांनी ‘जैविक संवर्धना’तील जर्नलमध्ये व्यक्त केली आहे.

विसाव्या शतकापूर्वी वाघांची संख्या एक लाखाहून अधिक होती, ती आता तीन ते चार हजारांवर आली आहे, तर लोकसंख्या ७९० दशलक्षावरून चार अब्जापर्यंत वाढली आहे. जगातील एकूण वाघांपैकी ५७ टक्के वाघ भारतात आहेत. लोकसंख्या झपाटय़ाने वाढून १४० कोटींवर पोहोचली. वाघांची संख्या  मात्र ४० हजारावरुन २,२२६ वर आली. आर्थिक, शैक्षणिक, स्थलांतरण आणि शहरीकरण धोरणापेक्षा हे परिदृष्य वेगळे आहे. २०१० मध्ये ५७ दशलक्ष लोकांनी व्याघ्र संवर्धन क्षेत्रात स्थलांतर केले. यामुळे वाघांचे क्षेत्र कमी होत आहे. हे स्थलांतर असेच सुरू राहिले तर एकविसाव्या शतकापर्यंत ४० कोटी लोक वाघांसोबत राहतील. हा आकडा १०६ कोटीपर्यंत देखील जाऊ शकतो. अशावेळी वाघच नव्हे तर काहीही जतन करणे शक्य होणार नाही. त्यामुळे हा धोका कमी करायचा असेल आणि वाघ व जंगलक्षेत्र वाचवायचे असेल तर शासकीय आणि सामाजिक स्तरावर मूलभूत बदल करावे लागतील. लोकशिक्षणावर अधिक भर द्यावा लागेल, मांसाहार कमी करावा लागेल व शहरे विस्तारणार नाहीत अशा पद्धतीने ती तयार करावी लागतील. शहरीकरण वाढू न देता ग्रामीण भागातील स्थलांतर देखील थांबवावे लागेल. तसेच सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लोकसंख्या स्थिर करावी लागेल आणि मानवी वर्तणुकीत बदल करावा लागेल, असे या अभ्यासात सांगितले आहे.

तज्ज्ञ काय सांगतात?

  • शहरी प्रशासन, शिक्षण, आर्थिक सुधारणा, व्यापार यावर बरेच काही अवलंबून आहे. -एरिक सँडरसन, प्रमुख लेखक व वरिष्ठ संवर्धन पर्यावरणशास्त्रज्ञ
  • गरिबी निर्मूलन, मुलींसाठी शिक्षण, मांसाहार कमी आणि शाश्वत शहरे यावर भर देणे आवश्यक आहे. -जो वॉलस्टोन, सहलेखक व वरिष्ठ उपाध्यक्ष, डब्ल्यूसीएस
  • धोकादायक निवासाचे संरक्षण करण्यासाठी संरक्षणाची योजना विकसित करणे आवश्यक आहे. – प्रा. ब्रायन जोन्स, सहलेखक.

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

राजुरा तालुक्यातील विरूर वनपरिक्षेत्रातील खांबाळा येथे जंगलात लाकडे आणण्यासाठी गेलेल्या एका महिलेवर वाघाने हल्ला करून तिला जागीच ठार केले. ही घटना  शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. वर्षां सत्यपाल तोडासे (४०) असे  मृत महिलेचे नाव आहे. वाघाचा नवीन वर्षांतला  हा चौथा बळी आहे. सासू व भावासमोरच वाघाने या महिलेला ठार केले. जंगलात झाडू तयार करण्यासाठी आवश्यक काडय़ा वेचत असताना वाघ समोर आला. तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यात सासू व भाऊ हे यशस्वी झाले मात्र, वर्षां तोडासे ही वाघाच्या तावडीत सापडली.