17 December 2017

News Flash

‘सेव्ह टायगर’ची हाकाटी, ‘सेव्ह ट्रायबल’चा आग्रह का नको?

गावकऱ्यांची शेतीच जंगलात आहे आणि अशावेळी शेती सोडून ते घरात तर राहू शकत

प्रतिनिधी, नागपूर | Updated: October 12, 2017 1:36 AM

माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांची वन्यजीवप्रेमींवर टीका

वाघ जगला पाहिजे हे आम्हीही मानतो, पण म्हणून त्यासाठी आदिवासींनी मरायचे का? ‘सेव्ह टायगर’ सारेच म्हणतात ‘सेव्ह ट्रायबल’ का म्हणत नाहीत? वन्यजीवप्रेमींच्या अट्टाहासामुळे आदिवासींनी वाघाचे खाद्य व्हायचे का? अशा तीव्र शब्दात भाजप नेत्या व माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी वन्यजीवप्रेमींवर ताशेरे ओढले.

शहरात राहून वाघाच्या बचावासाठी समोर येणाऱ्या वन्यजीवप्रेमींनी जंगलाशेजारी राहणाऱ्या आदिवासींच्या गावात येऊन राहावे. या गावांमध्ये तारांचे कुंपण तोडून आदिवासींच्या, गावकऱ्यांच्या घरात जेव्हा वाघ शिरतो आणि डोळ्यादेखत कुटुंबातील सदस्यांवर हल्ला करतो, तेव्हा त्यांना कुणीही वाचवू शकत नाही.

ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातून बोर अभयारण्यात सोडलेल्या या वाघिणीने एक नव्हे तर सहा माणसांचा जीव घेतला. अशावेळी तिला नरभक्षक का म्हणू नये? आदिवासी आणि खेडय़ापाडय़ातील लोक फक्त मरण्यासाठीच आहेत का? अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना वन्यजीवप्रेमींवर केली. गावकऱ्यांची शेतीच जंगलात आहे आणि अशावेळी शेती सोडून ते घरात तर राहू शकत नाही.

तसे वाटतच असेल तर सरकार, वनखाते आणि वन्यजीवप्रेमींनी या गावकऱ्यांना पोसण्याची तयारी दाखवावी. वाघ नरभक्षक का होतो याचा अभ्यास करण्याची गरज सरकार, वनखाते आणि वन्यजीवप्रेमींना आहे.

वाघांवरचे प्रेम म्हणजे पुस्तक लिहिणे नव्हे, अशा स्पष्ट शब्दात शोभाताई फडणवीस यांनी वन्यजीवप्रेमींना फटकारले. वाघ मरू नये असे वाटत असेल तर वाघाने माणसे मारू नयेत म्हणून वन्यजीवप्रेमींनी या जंगलालगतच्या आदिवासी, गावकऱ्यांसाठी काय केले आहे? चंद्रपूर जिल्ह्य़ातील पोंभूर्णा तालुक्यातील घनोटी गावात काही वर्षांपूर्वी वाघाने चार जणांना मारले. चंदनखेडय़ात बाजारात जाणाऱ्या एका कुटुंबातील महिलेवर झडप घालून तिला फरफटत नेले, तर आणखी एका गावात स्वयंपाक करत असलेल्या महिलेजवळ वाघ जाऊन पोहोचला, पण चुलीतली जळती लाकडे तिने वाघाच्या दिशेने भिरकावली म्हणून तिचा जीव वाचला.

याच परिसरात एका घरात रात्रभर खाटेखाली वाघ होता. अशी परिस्थिती नेहमीच जंगलालगतच्या गावकऱ्यांवर येते आणि ९० टक्के घटनांमध्ये त्यांचा बळी जातो. माणसांच्या रक्ताची चटक लागलेला वाघ हा नरभक्षकच असतो. अशा वाघाला ठार मारण्याची तरतूद वनखात्यातसुद्धा आहे. मग कायद्याच्या विरोधात जाऊन त्या नरभक्षक वाघाच्या मृत्यूला न्यायालयात जाऊन आव्हान देण्याची गरज वन्यजीवप्रेमींना का भासावी? अशा वन्यजीवप्रेमींवरच खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.

वाघ मारण्यासाठी मी स्वत: पुढाकार घेतला आहे, पण तो कायद्याच्या चौकटीत बसून घेतला आहे. वाघ वाचावा ही आमचीही भूमिका आहे, पण माणसांवर हल्ले करणाऱ्या वाघाला वनकायद्यातील तरतुदीनुसार ठार मारले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका शोभाताई फडणवीस यांनी घेतली.

First Published on October 12, 2017 1:36 am

Web Title: save tiger save tribal issue shobha fadnavis