राजेश्वर ठाकरे, लोकसत्ता

नागपूर :  महिला व बाल विकास खात्यातर्फे करण्यात आलेल्या सुमारे ८० कोटी रुपयांच्या ‘बेबी केअर किट’ खरेदीत धोरण घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात खरेदीच्या धोरणाला डावलून अतिशय वेगवान पद्धतीने निविदा अंतिम केल्याचे दिसून येत आहे.

राज्य शासनातर्फे शासकीय प्राथमिक केंद्र आणि शासकीय रुग्णालयात प्रसूत होणाऱ्या महिलांना त्यांच्या नवजात बालकांसाठी ‘बेबी केअर किट’ उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही योजना २६ जानेवारी २०१९ पासून लागू करण्यात आली आहे. किट पुरवठा करण्याचे कंत्राट मे. इंडो  अलाईड प्रोटीन फुड्स प्रा. लि. दादर, मुंबई यांना देण्यात आले.

निविदेतील अटी व शर्तीनुसार ‘बेबी केअर किट’ २०१९-२० या आर्थिक वर्षांकरिता खरेदी करण्याचे ठरले आहे. मात्र, याच दराने पुढील वर्षीदेखील खरेदी सुरू राहील. साहित्य खरेदीच्या १ डिसेंबर २०१६ च्या धोरणानुसार हे करता येत नाही. या प्रक्रियेत केवळ दोन कंत्राटदारांनी वार्षिक उलाढाल प्रमाणपत्र सादर केले. त्यामुळे तांत्रिक पात्रतेच्या पातळीवर निविदा रद्द करायला हवी होती, परंतु तसे झाले नाही. एवढेच नव्हे तर मागील सरकारने अतिशय वेगवान पद्धतीने ज्या दिवशी बेबी केअर किटचा जी.आर. काढला, त्याच दिवशी (१३ सप्टेंबर २०१९ ला) पुरवठा करण्याचे आदेशही काढले. हा पुरवठा ६० दिवसांत करावयाचा होता. मात्र, कंत्राटदाराने २६ डिसेंबर २०१९ पर्यंत एकही किट पुरवली नव्हती. जानेवारी २०२० ला १०,७६४ किटचे २७ ठिकाणी वाटप करण्यात आले. नागपूर आणि भंडारा जिल्ह्य़ात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रांना पुरवठा करण्यात आला. यात १७ वस्तूंचा समावेश आहे. वस्तूंच्या दर्जाबाबत संशय असतानाही पुरवठा झाला आणि वस्तू अतिशय उत्तम प्रतीच्या आहे, असा अभिप्रायही एका व्यक्तीने लिहिला. सर्वच प्रकल्प स्तरावर प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र तपासले असता असे लक्षात आले की एकाच व्यक्तीने सर्व ठिकाणच्या प्रमाणपत्रावर शेरा दिला आहे. ही निविदा तात्काळ रद्द करून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या निविदा प्रक्रियेत नेहमी सामील होणारे मुंबईचे लघु उद्योजक भानुदास टेकावडे यांनी केली आहे.

 ‘‘बेबी केअर कीटच्या निविदेतील घोळासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. अशाप्रकारे जनतेच्या पैशाची लूट करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीने मिळालेले कंत्राट रद्द झाले पाहिजे.’’

-विकास ठाकरे, आमदार, पश्चिम नागपूर.

‘‘स्मार्ट अंगणवाडी किटच्या कंत्राटाबाबत तक्रार आल्यानंतर ५० कोटींचे कंत्राट रद्द करण्यात आले. बेबी केअर किटचे प्रकरण अद्याप माझ्याकडे आले नाही. ते माझ्याकडे  आल्यास योग्य कारवाई करण्यात येईल.’’

– यशोमती ठाकूर, मंत्री, महिला व बाल विकास.

१७ वस्तूंची किंमत १ हजार ९९५.६३ रुपये

ई-निविदेअंतर्गत मे. इंडो अलाईड प्रोटीन फुड्स प्रा. लि. दादर, मुंबई यांना २०१९-२० या आर्थिक वर्षांत एकूण ४० लक्ष ०८७५ एवढे ‘बेबी केअर किट’ ७९,९९,९८,१७६ (एकोणऐंशी कोटी नव्याण्णव लाख अठ्ठय़ाण्णव हजार एकशे शाहत्तर) रुपयांत पुरवण्याचे कंत्राट मिळाले. प्रति ‘बेबी केअर किट’ संचाची किंमत १९९५.६३ रुपये निश्चित करण्यात आली. यात लहान मुलांचे कपडे, मच्छरदाणी, लहान मुलांची झोपण्याची  गादी, लहान मुलांचा शॅम्पू, नेल कटर आदी १७ वस्तूंचा समावेश आहे.

दुर्मिळ प्रशासकीय चपळता

‘बेबी केअर किट’ उपलब्ध करून देण्यासाठी १३ ऑगस्ट २०१९ रोजी ई-निविदा प्रकाशित करण्यात आली. तांत्रिक निविदा ४ सप्टेंबर २०१९ ला आणि वाणिज्यिक निविदा ९ सप्टेंबर २०१९ खुली करण्यात आली. म्हणजे खात्याने कामकाजाच्या चार दिवसात तांत्रिक मूल्यांकन केले. यासाठी एक हजार पाने तपासायची असल्याने किमान दहा ते १२ चे १५ दिवस लागतात. परंतु येथे एरव्ही न दिसणारी प्रशासकीय चपळता दाखवण्यात आली.  तसेच वाणिज्यिक निविदा उघडल्यानंतर दोन दिवसात विभागाने खरेदी समिती, नियोजन आणि वित्त विभागाकडून मान्यताही प्राप्त केली.