शहर बस संचालन करणारी कंपनी डिम्सने शहर बसने प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ दाखवून  महापालिकेकडून तीन वर्षांत दोन कोटी रुपये अधिक वसूल केले असल्याची माहिती असून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केली आहे.

विद्यार्थ्यांना शहर बससेवेचा लाभ मिळावा, यासाठी महापालिकेच्या परिवहन विभागाने सवलतीच्या दरात मासिक पास योजना  सुरू केली. पासेस देण्याची व्यवस्था डिम्स कंपनीकडे आहे.  २०१७ – १८ मध्ये ५८ हजार २६१ पासेस वाटप करण्यात आल्या.  मात्र, कंपनीने ६५ हजार पासेस दिल्याची नोंद केली. विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्यात पास देताना त्यावर नाव, जन्मतारीख आणि कुठून कुठपर्यंत जाणार याची माहिती दिली जाते. शिवाय ज्या दिवशी पास दिली जाते त्या दिवशीची तारखेची नोंद केली जाते. मात्र, कंपनीने दिलेल्या पासेसवर ती कुठल्या तारखेपर्यंत याची नोंद नव्हती. परिवहन विभागाच्या गेल्या आठवडय़ात झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या पासेसचा मुद्या समोर आला. कंपनीला याबाबत अहवाल मागवण्यात आला आहे.

ज्येष्ठ नागरिकांनाही ओळखपत्र दिले नाही, त्यांना प्रवास भाडय़ात सवलत देण्यात आली आहे. किती ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला  व त्यातून किती महसूल प्राप्त झाला याची आकडेवारी बघता त्यातही घोळ असल्याचे निदर्शनास येते.

दरम्यान,  या प्रकरणाची चौकशी केली जात असल्याचे परिवहन सभापती  बंटी कुकडे  यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.