महाविद्यालय-परीक्षा विभागाच्या संगनमताने छुपी चोरी; माहिती अधिकारातून वास्तव उघड

देवेश गोंडाणे, लोकसत्ता

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागामध्ये कोटय़वधींचा गैरव्यवहार होत असल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालय आणि परीक्षा विभागाच्या संगनमताने परीक्षा शुल्काची छुपी चोरी केली जात असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. नियमित शुल्कासह विनाविलंब, विलंब शुल्क, अतिविलंब शुल्कासह किती अर्ज आले याची माहितीच विद्यापीठाकडे नाही.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनांनुसार काही वर्षांपासून नागपूर विद्यापीठाने सत्रांत परीक्षा सुरू केली. यामुळे हिवाळी ९०० तर उन्हाळी ११०० परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांसाठी महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरून घेतले जातात. तसेच त्याचे ठराविक शुल्कही घेतले जाते. हे शुल्क विद्यापीठाकडे जमा करताना संबंधित महाविद्यालयाकडून रितसर अर्ज करून त्यात विद्यार्थीसंख्या आणि त्यांच्या परीक्षा शुल्काच्या रकमेचा उल्लेख असतो. हे पत्र आणि शुल्क भरल्याचा डिमांड ड्राफ जमा केला जातो. मात्र, हे करीत असताना संबंधित महाविद्यालयाकडून विद्यार्थी संख्येच्या तुलनेत कमी विद्यार्थ्यांचे पैसे जमा केले जात असल्याची माहिती आहे. परीक्षा विभागातील कर्मचारी, अधिकारी आणि संलग्नित महाविद्यालयाची एक साखळी गेल्या अनेक वर्षांपासून विद्यापीठाचा परीक्षा निधी छुप्या पद्धतीने चोरी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. विद्यापीठाकडे माहिती अधिकार कार्यकर्ता गेल्या दोन वर्षांपासून या माहितीसाठी लढा देत आहेत. हिवाळी २०१८ मध्ये अभियांत्रिकी परीक्षेला किती विद्यार्थी बसले, त्यांची संख्या, विद्यार्थ्यांची रोल लिस्ट, पैसे भरल्याची पावती, नियमित आणि बहि:शाल विद्यार्थ्यांकडून आलेल्या अर्जाची संख्या आणि शुल्क याची माहिती मागितली आहे. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यांचे परीक्षा शुल्क यात कुठलीही गोपनियता असण्याचे कारण नाही.  माहिती अधिकार कार्यकर्त्यांने यासाठी अपील अधिकाऱ्याकडे अर्ज केला असता ‘२च’ नियमाचा आधार देत ही माहिती देता येत नाही, असे उत्तर देण्यात आले. मात्र, त्यानंतरही संबंधित कार्यकर्त्यांने माहिती आयोगाकडे धाव घेतली असता आयोगाने सात दिवसांच्या आत ही माहिती द्यावी असे आदेश दिले. तरीही विद्यापीठाने नियमित परीक्षा अर्ज आणि शुल्काचा तपशीलच दिलेला नाही. परीक्षा विभागात

काही महिन्यांआधीच एका लिपिकाकडून परीक्षा कामाच्या अग्रीम रकमेची चोरी करून ती बाहेर व्याजाने दिली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. अशाच प्रकारे परीक्षा शुल्काची चोरी केली जात असल्याची कुणकुण होतीच. मात्र, नियमित विद्यार्थी आणि त्यांच्याकडून जमा करण्यात आलेले शुल्काच्या रकमेचा आकडाच विद्यापीठाकडे नसल्याचे परीक्षा विभागातील कोटय़वधींच्या गैरव्यवहाराची शंका बळावली आहे.

अशी होते चोरी

महाविद्यालयाकडून आलेले अर्ज आणि शुल्क परीक्षा विभागाकडून स्वीकारले जातात. हे स्वीकारताना पहिल्यांदा काही अर्ज आणि त्याचे शुल्क जमा केले जाते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात फक्त काही अर्ज जमा करून त्या विद्यार्थ्यांच्या नावाचा ‘रोल लिस्ट’मध्ये समावेश करण्यात येतो. दुसऱ्या टप्प्यात रोल लिस्टमध्ये जमा केल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शुल्क परीक्षा विभागातील संबंधीत कर्मचारी जमाच करीत नाही.  किंवा आलेल्या अर्जाच्या तुलनेत कमी विद्यार्थ्यांचे शुल्क जमा करून वरील पैसे हे संबंधित महाविद्यालय आणि परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने प़ळविले जातात.

विद्यापीठाचे कोटय़वधींचे नुकसान

विद्यापीठाच्या मागील वर्षांच्या अर्थसंकल्पात दिलेल्या माहितीनुसार,  परीक्षा शुल्क -६१ कोटी ८८ लाख,पदवीदान समारंभ शुल्क – ३५ लाख ७८ हजार, विलंब शुल्क/दंड – ६७ लाख ३२ हजार यासह पुनर्मूल्यांकन शुल्क आणि इतर शुल्क मिळून विद्यापीठाकडे ६४ कोटी १४ लाख रुपये परीक्षा शुल्क जमा होतात. परीक्षा विभागाच्या नावावर हा एकत्रित निधी गोळा केला जातो. मात्र, विद्यार्थी संख्या आणि आलेल्या शुल्काचा ताळमेळ बसत नसल्याने विद्यापीठाचे कोटय़वधींचे नुकसान होत आहे.

सध्या परीक्षा अर्ज आणि शुल्क हे ऑनलाईन जमा केले जाते. त्यामुळे त्यात कुठल्याही शुल्क चोरीचा प्रकार घडण्याची शक्यताच नाही.  परीक्षेला बसलेल्यांची संख्या आणि शुल्काची माहिती माहिती अधिकारात देण्याला काहीही हरकत नाही. या प्रकरणाची चौकशी केली जाईल.

– प्रफुल्ल साबळे, संचालक, परीक्षा व मूल्यांकन विभाग.