सहा वाहनचालकांविरुद्ध कारवाई

क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वाहून नेणाऱ्या स्कूलबस, स्कूल व्हॅन आणि स्कूल ऑटोंविरुद्ध कारवाईची मोहीम वाहतूक विभागातर्फे राबवण्यात येत असताना शुक्रवारी शहरातील अनेक स्कूलबसचे चालक हे मद्यप्राशन केलेले आढळले. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करून वाहने जप्त केली.

शहरातील जवळपास दीडशे शाळांमधील विद्यार्थ्यांकरिता स्कूलबसची व्यवस्था आहे. ही व्यवस्था नसलेल्या शाळांमध्ये पालक खासगी स्कूल व्हॅन व ऑटोने त्यांची मुले पाठवतात. मात्र, स्कूलबस, स्कूल व्हॅन व स्कूल ऑटो संचालक अधिक नफा कमवण्याच्या उद्देशाने मंजूर संख्येपेक्षा कितीतरी अधिक मुले वाहनांत डांबतात. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी घेतल्याने वाहनांचे अपघात होतात. पर्यायी कुणालातरी जीव गमवावे लागते. ही बाब लक्षात घेऊन पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या सूचनेनुसार पोलीस उपायुक्त रवींद्र परदेशी यांनी शहरात क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वाहून नेणाऱ्या वाहनांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला.

बुधवारी पहिल्या दिवशी ६६५ वाहनांवर कारवाई करण्यात आली. आता मद्यप्राशन करून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांविरुद्धही कारवाईचे निर्देश देण्यात आले. शुक्रवारी त्यासंदर्भात चेंबर-२ अंतर्गत चार आणि चेंबर-३ अंतर्गत एका वाहनावर कारवाई करण्यात आली. चेंबर-२ अंतर्गत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर यांच्या नेतृत्त्वात एमएच-३१, डीएस-५०४२, एमएच-३१, सीक्यु-१३४३, एमएच-४९, जे-४०६ या स्कूलबस आणि एमएच-३१, केएम-०२१६ क्रमांकाच्या स्कूल ऑटोचालकाचे अनुक्रमे विजय गणपतराव चौधरी, सचिन अशोकराव अंडुस्कर, जिम्मी प्रिन्स अ‍ॅन्थोनी आणि शेख फिरोज हुसेन शेख अंसार हुसेन या मद्यप्राशन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घ्या

स्कूलबस, व्हॅन व ऑटोचालकांच्या भरवशावर आपण आपली मुले सोडून देतो. दिवसेंदिवस वाहनचालकांकडून मुलांवर अत्याचाराचे प्रमाण समोर येत आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षेकरिता त्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनचालक, वाहकांची माहिती ठेवावी. काही पैसे वाचवण्यासाठी कुणाच्याही भरवशावर मुले सोडू नका. क्षमतेपेक्षा अधिक मुलांची वाहतूक करणे किंवा मद्यप्राशन करून वाहन चालवण्यामुळे अपघाताचा धोका संभवतो. शाळा व्यवस्थापन, पालकांनी याची काळजी घ्यावी संशयास्पद वाहनासंदर्भात वाहतूक पोलिसांना कळवावे.    – कल्पणा जाधव, प्रभारी संचालक, रातुम शारिरीक शिक्षण विभाग 

दुसऱ्या वाहनाने विद्यार्थी सोडले

चेंबर-३ अंतर्गत दिल्ली पब्लिक स्कूलसाठी चालणाऱ्या नटवर टॅव्हल्सच्या चालकाने मद्यप्राशन केले होते. त्याच्यावर कारवाई करण्यात आली. बसमध्ये ६० विद्यार्थी होते. पोलिसांनी वाहन जप्त केले आणि शाळा प्रशासन व स्कूलबस संचालकांना माहिती देऊन दुसरी बस पाठवायला सांगितली. त्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यात आले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक बागुल यांनी दिली.