01 October 2020

News Flash

‘स्कूलबस’मधील मुलांवर पालकांचीही नजर!

शाळेत गेलेला मुलगा घरी परत येईस्तोवर प्रत्येक पालकांचे मन कासावीस असते.

‘सीसीटीव्ही’चे छायाचित्र थेट मोबाइलवर; नागपूरच्या ५ वाहनांत अद्ययावत यंत्रणा १५ मार्चपासून

शाळेत गेलेला मुलगा घरी परत येईस्तोवर प्रत्येक पालकांचे मन कासावीस असते. त्यांच्या सुरक्षेसाठी जिल्हा स्कूलबस सुरक्षितता समितीने शहरातील प्रत्येक ‘स्कूलबस’मध्ये सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय आधीच घेतला आहे. त्याअंतर्गत १५ मार्चपर्यंत सुमारे ५ स्कूलबसमध्ये अ‍ॅपबेल टेक्नालॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून ही सीमबेस यंत्रणा लागणार आहे. त्यात प्रत्येक दोन मिनिटांनी मोबाईलच्या मदतीने पालकांना त्यांच्या मुलांचे वाहनातील कॅमेऱ्याने घेतलेले छायाचित्र बघता येईल. त्यामुळे वाहनात प्रवास करणाऱ्या मुलांवरही पालकांना नजर ठेवता येईल.

नागपूरसह राज्याच्या अनेक भागात रोज अपहरण, ‘स्कूलबस’च्या अपघातासह अनेक घटना बघायला वा ऐकायला मिळतात.

प्रत्येक घटनांमुळे मुले असलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या मनाला धक्काच बसतो. या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा स्कूलबस सुरक्षितता समितीकडून प्रत्येक वाहनांत जीपीएस, सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह इतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात पायलट प्रोजेक्ट म्हणून पोदार इंटरनॅशनल, सेंटर पॉईंट स्कूल, सांदीपनी, दिल्ली पब्लिक स्कूल या शाळांतील पाच स्कूलबसच्या वाहनांमध्ये ही यंत्रणा लागणार आहे. त्याकरिता पुण्यातील अ‍ॅपबेल टेक्नालॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून मोफत ही यंत्रणा या वाहनांत लावण्याचे काम केले जात आहे.

सॉफ्टवेअरवर आधारित ही यंत्रणा १५ मार्चपर्यंत सुरू होईल. त्यात पाचही वाहनातील सीसीटीव्ही कॅमेरे व जीपीएस यंत्र हे मोबाईलच्या सीमवर आधारित राहील. छायाचित्राकरिता टूजी आणि व्हिडीओ रेकॉर्डिगकरिता थ्री जी सीमकार्डचा वापर होणार आहे. यंत्रणेतील सॉफ्टवेअरमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांसह वाहनाच्या चालक व वाहकाची माहिती अपलोड केली जाईल. तेव्हा प्रत्येक दोन मिनिटात सीसीटीव्ही कॅमेरे मुलांचे छायाचित्र व व्हिडीओ आपल्या सॉफ्टवेअरमध्ये स्वयंचलित अपलोड करतील. हे छायाचित्र वेळोवेळी मुलांचे पालक आपल्या मोबाईलवर एक अ‍ॅपडाऊनलोड करून सहज बघू शकतील. त्यातच पालकाला स्कूलबसमध्ये गेलेला मुलगा कुठे आहे, हे केव्हाही कळू शकेल.

पालकांच्या मोबाईलवर स्कूलबसचे संदेश

पाच स्कूलबसमध्ये लागणाऱ्या या यंत्रणेतून स्वयंचलित पद्धतीने मुलांच्या पालकांच्या मोबाईलवर विविध संदेश जातील. त्यानुसार ही स्कूलबस मुलांना घ्यायला निघाली असल्यास ती संबंधित ठिकाणी पोहोचण्याच्या ५ मिनिटापूर्वी आणि शाळेतून मुलांना घेतल्यावर मुलांना निश्चित स्थळी पोहोचण्याच्या पाच मिनिटापूर्वी ही यंत्रणा पालकांना तसा संदेश थेट मोबाइलवर देईल. त्यामुळे पालकांना वेळीच मुलांना सोडणे व घेण्याकरिता निश्चित ठिकाणी वेळेवर पोहोचणे शक्य होईल. प्रत्येक स्कूलबसमध्ये मुलांना शिरताना व बाहेर पडताना एटीएमसदृश्य कार्ड विशिष्ट मशीनमध्ये स्व्ॉप करावे लागेल, अशी माहिती अ‍ॅपबेल टेक्नालॉजी प्रा. लिमी. कंपनीचे संचालक डॉ. रवींद्र गोविंदवार यांनी दिली.

जिल्ह्य़ात ३,११८ स्कूलबसने विद्यार्थ्यांची वाहतूक

नागपूर जिल्ह्य़ात सगळ्याच संवर्गातील एकूण ४ हजार ६० शाळा आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या १ हजार ५७९, नागपूर महापालिकेच्या १६४, नगर परिषदेसह नगरपालिकांच्या ६९, खासगीच्या १ हजार १७८, खासगी विना अनुदानित / कायम विना अनुदानित/ मदरसाच्या १ हजार, शासकीय २१ आणि इतर संवर्गातील ४९ शाळांचा समावेश आहे. या शाळेतील लक्षावधी विद्यार्थ्यांची रोज जिल्ह्य़ातील ३ हजार ११८ स्कूलबस आणि स्कूलव्हॅनने वाहतूक केली जाते. या वाहनांमध्ये नागपूर शहरातील १,९१८ तर ग्रामीणच्या १ हजार २०० स्कूलबस, स्कूलव्हॅनचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2017 12:51 am

Web Title: school bus issue in nagpur 2
Next Stories
1 शतप्रतिशत महिला; रेल्वेचा अभिनव प्रयोग
2 प्रा. साईबाबाला सिनेस्टाईल अटक करून ग्रीन कॉरिडोरने विमानतळ गाठला
3 महिला दिन विशेष : वेगळ्या वाटेवरच्या पाचजणी!
Just Now!
X